बेळगाव : भारत देश हा विविधतेने नटलेला आहे. इथे सर्व जाती-धर्माचे विविध भाषिक लोक गुण्यागोविंदाने राहतात. बेळगांवमधील मराठी भाषिक लोक प्रभू श्रीरामाना स्वतःच्या मातृभाषेत अभिवादन करत असतील तर त्यात गैर ते काय? प्रभू श्रीराम कोणा एका भाषिकांचे दैवत नसून ते समस्त हिंदू धर्मियांचे आराध्य दैवत आहेत त्यामुळे बेळगावातील मराठी भाषिकांनी श्रीरामाचे फलक मराठी भाषेतून लावले म्हणून हटविण्यात आले आहेत ही बाब निषेधार्ह आहे. बेळगांव महानगरपालिकेच्या या कृत्या विरोधात कर्नाटक सरकारने कडक पावले उचलावीत अन्यथा त्याचे परिणाम महाराष्ट्रात दिसतील असा इशारा हातकणंगले मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी दिला आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर, सागर पाटील, कपिल भोसले यांचा कपिलेश्वर उड्डाणपूल येथे लावण्यात आलेला श्रीराम मंदिर उद्घाटन सोहळ्यासंदर्भातील शुभेच्छा फलक काल पालिका प्रशासनाकडून हटविण्यात आला. संपूर्ण प्रभुश्रीरामांच्या मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला देशभरात उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले आहे जगभरातील हिंदू बांधव आपापल्यापरिने श्रीराम बद्दलची श्रद्धा आदर व्यक्त करण्यासाठी ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करीत आहेत. कालच बेळगांव येथे श्रीरामाचे शुभेच्छा फलक केवळ मराठीत लिहिले म्हणून ते प्रशासनाने हटविले. जातीधर्मापलीकडे पाहण्याची आपली संस्कृती आहे. त्यामुळे केवळ भाषा द्वेष म्हणून कर्नाटक सरकारची मराठी भाषिकांवर दडपशाही असण्याचे कारण नाही, असे खासदार धैर्यशील माने म्हणाले.