
बेळगाव : मराठा आरक्षणासाठी मुंबई येथे मराठा नेते मनोज जरांगे यांनी सुरु केलेल्या आंदोलनाला बेळगावातील सकल मराठा समाजाने समर्थन देत आंबेडकर उद्यानात एक दिवसाचे सांकेतिक आंदोलन केले. विशेष म्हणजे दलितांसह विविध समाजाच्या संघटनांनी, सर्व पक्षांनी देखील यात सहभाग घेत पाठिंबा दिला.महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणाचे आंदोलन पेटले आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र सरकारला अंतिम मुदत देत समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी बेमुदत आंदोलन सुरु केले आहे. बेळगावात सकल मराठा समाजाने त्यांच्या आंदोलनाला समर्थन जाहीर केले आहे. यासाठी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात आज शनिवारी या सर्व समाजांच्या वतीने एक दिवसाचे लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी बोलताना माजी महापौर शिवाजी सुंठकर, ऍड. अमर येळ्ळूरकर यांनी सांगितले की, महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे यांनी जे आंदोलन सुरु केले आहे, त्याला समर्थन देण्यासाठी आम्ही आज बेळगावात लाक्षणिक धरणे करत आहोत. महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटकातही मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे अशी मागणी केली. मराठा समाजाची शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय दृष्ट्या प्रगती होण्यासाठी त्याला आरक्षण देण्याची तीव्र गरज आहे. कर्नाटक सरकारने न्या. सदाशिव आयोगाचा अहवाल लागू करून मराठा समाजाला न्याय देण्याची मागणी त्यांनी केली. दुसऱ्यांचे आरक्षण काढून घेऊन आम्हाला देऊ नका, पण आमच्या हक्काचे आरक्षण द्या, त्यासाठी जी फाईल सरकारने दडपून ठेवली आहे ती काढून मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवा अशी मागणी त्याची केली.
यावेळी बोलताना दलित नेते मल्लेश चौगुले म्हणाले की, ‘जिथे शिवराय तिथे भीमराय’ अशी आमची भूमिका आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले नसते तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर झाले नसते, बाबासाहेब नसते तर आम्ही दलित राहिलो नसतो. म्हणून मोठ्या भावाच्या हक्कासाठी आम्ही लहान भाऊ म्हणून त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही मराठा समाजासाठी लढणार आहोत.
सागर पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षणासाठी मुंबईत लढणाऱ्या लढवय्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत हे दाखवण्यासाठी आज बेळगावात आम्ही आंदोलन करत आहोत. बेळगाव-सीमाभागातील मराठी माणसावर अनेक अन्याय केले जात आहेत. आमचे विरोधक आमच्या दारापर्यंत आले आहेत, ते कधी घरात घुसतील सांगता येत नाही. त्यामुळे मराठी माणसाने दक्ष राहिले पाहिजे असे त्यांनी सांगितले.
या धरणे कार्यक्रमात सकल मराठा समाजाचे संयोजक रणजित चव्हाण-पाटील, गुणवंत पाटील, माजी आमदार परशुरामभाऊ नंदिहळ्ळी, महादेव पाटील, शंकर बाबली महाराज, महादेव पाटील, रमाकांत कोंडुसकर, विकास कलघटगी, चंद्रकांत कोंडुसकर यांच्यासह मराठा व अन्य समाजाचे नेते, कार्यकर्ते सहभागी झाले होते.
Belgaum Varta Belgaum Varta