
बी. बी. देसाई; बेळवट्टीत निवृत्त मुख्याध्यापक बेळगावकर यांचा सत्कार
बेळगाव : आई ही मुलाच्या जीवनातील पहिली शाळा, तर शाळा ही दुसरी आई असते. त्यांच्या योग्य संस्कारातूनच विद्यार्थ्यांचे जीवन घडत असते. आजचा एक आदर्श विद्यार्थी आणि भावी जीवनातील आदर्श नागरिक बनवण्याचं महत्त्वाचं कार्य शाळा करीत असते, असे विचार विश्वभारत सेवा समितीचे संचालक बी. बी. देसाई यांनी व्यक्त केले. बेळवट्टी येथील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक पी. एम. बेळगावकर यांच्या निवृत्ती निमित्त आयोजित केलेल्या कृतज्ञता समारंभात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
विश्वभारत सेवा समितीचे संस्थापक माजी आमदार गुरुवर्य परशुरामभाऊ नंदीहळ्ळी यांच्या सानिध्यात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष विजयराव नंदीहळ्ळी होते. प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त मुख्याध्यापक पी. के. तरळे, पी. एम. टपालवाले, आर. आय. कोकितकर, शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष रामू गुगवाड, डॉ. गणपत पाटील आदी उपस्थित होते.
देसाई यांनी मुख्याध्यापक बेळगावकर यांनी शाळेच्या प्रगतीसाठी दिलेल्या योगदानाचा गौरव केला व गुरुवर्य परशुरामभाऊ नंदीहळ्ळी यांनी खेडोपाडी सुरू केलेल्या शैक्षणिक संस्थामुळे बेळगाव, खानापूर व महाराष्ट्रातील चंदगड तालुक्यात शैक्षणिक विकास झाल्याचे सांगितले. गुरुवर्य नंदीहळ्ळी, विजय नंदीहळ्ळी, प्रकाश चलवेटकर, ग्रामीण क्षेत्र समन्वयाधिकारी एम. एस. मेदार यांचीही बेळगावकर यांच्या कार्याचा गौरव करणारी भाषणे झाली.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाल्यानंतर माजी आमदार नंदीहळ्ळी यांनी सरस्वती पूजन केले. मुख्याध्यापक बेळगावकर यांनी आपणास ज्ञानार्जन केल्याबद्दल गुरुवर्य नंदीहळ्ळी, तरळे, कोकितकर, टपालवाले यांचे गुरुपूजन करून कृतज्ञता व्यक्त केली. त्यानंतर बेळगावकर व त्यांच्या पत्नी सौ. प्रियांका यांचा माध्यमिक विद्यालय व विद्यार्थी संघटना तसेच विविध संघ, संस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. बेळगावकर यांनी आपल्या सत्कारबद्दल कृतज्ञता व्यक्त केली व यापुढेही सामाजिक कार्यात कार्यरत राहणार असल्याचे सांगितले.
यु. एस. होनगेकर यांनी यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. आर. बी. देसाई व ईश्वर पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास ग्रामपंचायत अध्यक्ष विठ्ठल पाटील, माजी तालुका पंचायत सदस्य एन. के. नलावडे, भुजंग गाडेकर, नारायण नलावडे, सतीश पाटील, सातेरी चौगुले, डी. एन. देसाई, डॉ. अर्जुन पाटील, लुमाण्णा नलावडे, ऍड. सुरेश देसाई आजी- माजी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta