Friday , October 18 2024
Breaking News

अनगोळमध्ये विहिरीत बुडून बालकाचा मृत्यू : पाईपला पकडल्याने दुसरे बालक वाचले

Spread the love

 

बेळगाव : सोमवारी रामलल्ला उत्सव साजरा होत असताना कुरबर गल्ली, अनगोळ येथे भजन कार्यक्रम ठेवण्यात आला होता. बाजूलाच काही मुले लपंडाव खेळत होती. त्यापैकी दोघा बालकांना बाजूला असलेल्या उघड्या विहिरीचा अंदाज न आल्याने ते ४० फूट विहिरीत बुडाले. त्यात एकाचा मृत्यू झाला तर दुसरा बालक पाण्यात पडल्यानंतर लगेचच त्याच्या हाती पाईप लागल्याने त्याला धरून थांबल्याने तो वाचला. सोमवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली.
अरव किरण शारबिद्रे (वय ११, रा. कुरबर गल्ली क्रॉस, रघुनाथ पेठ, अनगोळ) असे मृत बालकाचे नाव आहे. सोहम परशुराम सुतार (वय ११, रा. कुरबर गल्ली, अनगोळ) हा आश्चर्यकारकरित्या बचावला असून तो ठणठणीत आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, रामलल्ला प्रतिष्ठापनेनिमित्त कुरबर गल्ली अनगोळ येथे भजन आयोजित केले होते. सर्व लोक भजनात दंग होते. बाजुला काही लहान लपंडाव खेळत होती. इकडून तिकडे पळत होती. तेथून काही अंतरावरच विहीर आहे. अरव व सोहम ही दोन मुले एकमेकांपाठोपाठ पळताना समोरील उघड्या विहिरीचा त्यांना अंदाज आला नाही. त्यामुळे दोघेही सुमारे ४० फूट खोल विहिरीत पडले. या विहिरीत १० फुटापर्यंत पाणी आहे. दोघे विहिरीत पडल्याची कल्पना आजूबाजूच्या लोकांना लगेच आली. त्यांनी तातडीने त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केला. विहिरीत पडलेल्यांपैकी अरवच्या डोक्याला मार लागल्याने तो बेशुद्ध होऊन पाण्यात पडला. सोहम पाण्यात पडल्यानंतर त्याच्या हाती विहिरीत सोडलेली पाईप लागली. त्यामुळे तो पाईपला धरून बसला. दोघांनाही बाहेर काढेपर्यंत अरवच्या पोटात पाणी गेले होते. दोघांनाही तातडीने खासगी रूग्णालयात दाखल केले. परंतु, रात्री ९.३० वा. डॉक्टरांनी अरवला मृत घोषित केले. तर सोहमची प्रकृती ठणठणीत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

वैश्यवाणी समाजातर्फे कोजागिरी पौर्णिमा साजरी

Spread the love  बेळगाव : श्री समादेवी संस्थान, वैशवाणी समाजातर्फे बुधवारी रामनाथ मंगल कार्यालयात कोजागिरी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *