Monday , December 8 2025
Breaking News

प्रगतिशील लेखक संघाचे तिसरे मराठी साहित्य संमेलन रविवारी

Spread the love

 

तुकाराम महाराज सांस्कृतिक भवनात दिवसभर तीन सत्रात विविध कार्यक्रम

बेळगाव : येथील प्रगतिशील लेखक संघाच्यावतीने तिसरे मराठी साहित्य संमेलन रविवार दि. २८ जानेवारी रोजी भरविण्यात येणार आहे. तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन (ओरिएंटल हायस्कूलशेजारी) रेल्वे ओव्हरब्रिजजवळ, खानापूर रोड येथे हे संमेलन होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे (मुंबई) हे या संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.

नामवंत साहित्यिक, नाटककार, चित्रपट निमति-लेखक-दिग्दर्शक- गीतकार व निर्भिड पत्रकार आणि महाराष्ट्र राज्य व्हावे यासाठी झालेल्या लढ्याचे अग्रणी नेते आचार्य प्र. के. अत्रे यांची २०२३ साली १२५ वी जयंती होती. त्याचे औचित्य साधून ‘आचार्य अत्रे यांच्या विविध क्षेत्रातील कार्याचे महत्व’ ही या संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना असणार आहे.

सकाळी ८.३० ते ९.४५ या वेळेत नाष्टा झाल्यानंतर सकाळी १० वाजता संमेलनास प्रारंभ होणार आहे. अन्नपूर्णा परिवाराच्या अध्यक्षा मेधा सामंत-पुरव (पुणे) यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. उ‌द्घाटनानंतर आचार्य अत्रे : संयुक्त महाराष्ट्र व सीमाप्रश्न (लेखक : कृष्णा शहापूरकर), प्रतिभेच्या पारंब्या (लेखिका डॉ. सुनंदा शेळके) या पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. त्यानंतर अन्नपूर्णा महिला मंडळातर्फे ज्येष्ठ नेते डॉ. भालचंद्र कांगो यांना स्वातंत्र्य सेनानी भारतरत्न अरूणा असफअली पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

दुसऱ्या सत्रात दुपारी १२ वाजता डॉ. कांगो यांचे ‘आचार्य अत्रे आज हवे होते’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. त्यानंतर दुपारी २ ते ३ भोजन होईल. भोजनानंतर ३.१५ वाजता होणाऱ्या तिसऱ्या सत्रात ‘लोकशाहीला फॅसिझमचा धोका कधी असतो?’ या विषयावर शिवाजी विद्यापीठातील इतिहास विभाग प्रमुख डॉ. अवनीश पाटील यांचे तसेच ‘निर्भय जीवन कसे जगावे ?’ या विषयावर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. हमीद दाभोलकर यांचे व्याख्यान होणार आहे.

तिसऱ्या सत्रात सायंकाळी ६ वाजता प्रगतिशील लेखक संघाच्या कवींचे संमेलन होणार आहे. डॉ. सुनंदा शेळके यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होणार आहे. संमेलनाध्यक्ष मधुकर भावे हे ज्येष्ठ पत्रकार व लेखक आहेत. आचार्य अत्रे यांचे ते सहकारी होते. अत्रे यांच्या ‘मराठा’ दैनिकात प्रारंभापासून त्यांनी वार्ताहर म्हणून काम केले. त्यानंतर दैनिक लोकमतच्या औरंगाबाद आवृत्तीचे संपादक म्हणूनही त्यांनी काम केले. त्यांनी मंतरलेले दिवस, यशवंतराव ते विलासराव, महानायक ही पुस्तके लिहिली आहेत. तसेच महाराष्ट्र :६० या ग्रंथाचे त्यांनी संपादन केले आहे.

उ‌द्घाटक मेधा सामंत-पुरव या अर्थतज्ञ असून अन्नपूर्णा परिवाराच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे काम करीत आहेत. त्या उत्तम कवियत्री असून चिन्नकारही आहेत.
अरूणा असफअली पुरस्काराचे मानकरी डॉ. भालचंद्र कांगो हे कम्युनिस्ट पक्षाच्या राष्ट्रीय मंडळाचे सदस्य आहेत. एमबीबीएस असूनही ते पक्षाचा पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून कार्यरत आहेत. अनेक कामगार चळवळीचे त्यांनी नेतृत्व केले आहे. तसेच स्तंभ लेखक म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत.

About Belgaum Varta

Check Also

कर्नाटक दडपशाहीला जुगारून प्रशासकीय जागेत महामेळावा यशस्वी

Spread the love  बेळगाव : पहाटेपासून अटकसत्र सुरू करून महामेळावा उधळून लावण्याचे कर्नाटकी प्रयत्न हाणून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *