
येळ्ळूर : गेल्या चार दिवसापासून येळ्ळूरचे भाविक शांकभरी पौर्णिमेच्या यात्रोस्तवासाठी सौंदत्ती डोंगरावर वास्तव्यास गेले असून, आज गुरुवार (ता. 25) रोजी सकाळी साडेअकरा नंतर भाविकांच्या वतीने सामूहिक पडल्यांचा कार्यक्रम सौंदत्ती यल्लमा डोंगरावर मोठ्या उत्साहात पार पडला. श्री चांगळेश्वरी ट्रस्ट मंडळ, व समस्त गावकऱ्यांच्या वतीने हा पडल्या भरण्याचा कार्यक्रम उत्साही वातावरणात पार पडला. यावेळी भाविकांच्या वतीने “उदो गे आई उदो”च्या जयघोषणात सामूहिक पडल्या भरण्यात आल्या. पहिल्यांदा सुक्या पडल्या व त्यानंतर ओल्या पडल्या भरण्यात आल्या. यावेळी चांगळेश्वरी देवी मानकऱ्यांच्या वतीने यल्लमा देवीला गाऱ्हाणे घालण्यात आले. येळ्ळूरच्या पोरा बाळास, गुराढोरास, सुखी ठेव, रोगराई नष्ट करून गावात समृद्धी आण, पीक पाणी व्यवस्थित पिकू दे, असे गाऱ्हाणे घालण्यात आले. यानंतर जेवणावळी झाल्या अशा पद्धतीने डोंगरावरील यात्रोत्सव उत्साहात पार पडला.
येळ्ळूर मळ्यातील यात्रोत्सव मंगळवारी
यल्लमा डोंगरावरील यात्रा यात्रोत्सव संपवून येळ्ळूरचे भाविक येळ्ळूर वेशीत असलेल्या थडे देवाच्या आवारात गावाबाहेर वास्तव्य करतात. त्यानंतर मंगळवार( ता. 30) रोजी या ठिकाणी मळ्यातील यत्रोत्सव साजरा केला जातो. याही ठिकाणी सकाळी भाकरी व भाजीच्या सामूहिक पडल्या भरल्या जातात तर सायंकाळी गोडधोड जेवणाच्या पडल्या भरून, भाविकासाठी जेवण दिले जाते व रात्री उशिरा या यात्रा उत्सवाची सांगता होते.
Belgaum Varta Belgaum Varta