
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील दलितांवर कोणत्याही कारणास्तव अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दिली. बेळगाव येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित दलित तक्रार निवारण सभेचे उद्घाटन पोलीस अधीक्षक भीमाशंकर गुळेद यांनी संविधान प्रस्तावनेचा वाचन करून केले. यावेळी बोलताना त्यांनी कोणत्याही कारणास्तव दलितांवर अन्याय होऊ देणार नाही, मग तो कितीही मोठा व्यक्ती असला तरी त्याच्यावर न डगमगता कारवाई केली जाईल. दलितांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही काम करू, अशी ग्वाही दिली. या बैठकीत जिल्ह्यातील दलित नेत्यांनी यावेळी सांगितले की, दलित युवक व विद्यार्थी रोजगार व शिक्षणासाठी कर्ज घेण्यासाठी बँकेत गेल्यास बँक कर्मचारी योग्य प्रतिसाद देत नसल्यामुळे आमच्या समाजातील तरुणांचे हाल होत आहेत, त्यामुळे आमच्या युवकांना सुलभ पद्धतीने कर्ज उपलब्ध करून देऊन न्याय द्यावा, अशी मागणी केली. आणखी एका नेत्याने, राज्यघटनेचे शिल्पकार आंबेडकरांचा पुतळा शहरे आणि खेडेगावात उभारण्याची परवानगी मिळत नसल्याचे सांगून अधिकारी दलितांचा छळ करत असल्याचा आरोप केला. या बैठकीत सीआरसी एसपी रवींद्र गडादी, एएसपी बसरगी आणि वेणुगोपाल, मागासवर्गीय कल्याण अधिकारी बबली, डीएसपी, सीपीआय, जिल्हा दलित नेते सहभागी झाले होते.
Belgaum Varta Belgaum Varta