बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने निवडणूक आयोगाकडे बेळगावमध्ये मराठी मतदार याद्या पुरवाव्या यासाठी तक्रार अर्ज नोंदवण्यात आला होता, त्याला अनुसरून आज बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती पदाधिकाऱ्यांना बोलवून घेऊन मराठी मतदार याद्या या संकेतस्थळावर उपलब्ध झाल्या असून त्या पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहेत अशी माहिती दिली. यावेळी समिती शिष्टमंडळाने पीडीएफ व्यतिरिक्त सदर मतदार यादी छापील स्वरूपात उपलब्ध करून द्याव्यात तसेच इतर निवडणूक प्रक्रियेतील कागदपत्रे सुद्धा मराठी भाषेत उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी यावेळी केली. छापील याद्या या अधिकृत राष्ट्रीय राजकीय पक्षांना त्यांच्या मागणीनुसार उपलब्ध केल्या जातील असे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले व निवडणूक प्रक्रियेवेळी मराठी भाषेतील फॉर्म व अर्ज व इतर कागदपत्र उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले. यावेळी अध्यक्ष अंकुश केसरकर, समिती नेते अमर येळ्ळूरकर, श्रीकांत कदम, विकास कलघटगी, आनंद पाटील, आदी उपस्थित होते.