Tuesday , May 28 2024
Breaking News

पोलिसांनी खोटे गुन्हे मागे घ्यावे : श्रीरामसेना हिंदुस्तानची मागणी

Spread the love

बेळगाव : श्रीराम सेना हिंदुस्तान यांच्यावतीने सीमा भागातील युवकांवर तसेच स्वयंसेवकांवर पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या गंभीर कलमांतर्गत निरपराध विरुद्ध खोटे गुन्हे दाखल केल्याने भारताचे गृहमंत्री अमित शहा आणि कर्नाटक सरकारचे गृहमंत्री अरग ज्ञानेन्द्र यांना निवेदन देण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे बेंगलोरमध्ये विटंबना झाल्यानंतर त्याचे पडसाद बेळगावमध्ये उमटले. यावेळी 17 डिसेंबर 2021 रोजी धर्मवीर संभाजी महाराज सर्कल येथे काही हिंदू समर्थक संघटनांनी निदर्शने केली. सुमारे तीन हजार राष्ट्रवादी नागरिकांनी धर्मवीर संभाजी महाराज सर्कल येथे शांततापूर्ण निदर्शने केली. त्याच वेळी रात्री काही अज्ञात व्यक्तींनी बेळगाव शहरात दगडफेक करून वाहनांचे नुकसान केले. या दगडफेक करणाऱ्या अज्ञातांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याऐवजी निदर्शने करण्यासाठी आलेल्या निरपराध समाजसेवक व तरुणांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. कर्नाटक पोलिसांनी विविध कलमांतर्गत निरपराध तरुणांना अटक करत असल्याने समाजात अशांतता पसरली आहे. त्यामुळे पोलिसांनी गोष्टीची शहानिशा करून गुन्हे दाखल करावी अशा मागणीचे निवेदन गृहमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे. बेळगावातील पोलिसांनी दगडफेक करणार्‍या खर्‍या गुन्हेगारांवर गुन्हे दाखल करण्याऐवजी अनेक निरपराध समाजसेवक व तरुणांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांच्या नातेवाईकांना न सांगता रात्रीच्या वेळी जबरदस्तीने अटक करून अज्ञात स्थळी नेण्याचे प्रकार चालविले आहेत. बेळगाव पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली बेळगाव पोलिसांनी 27 निरपराध व्यक्तींविरुद्ध कॅम्प पोलीस स्टेशन, खडेबाजार पोलीस स्टेशन आणि मार्केट पोलीस स्टेशन येथे कलम 143, 147, 148, 307, 353, 332 नुसार दंडनीय गुन्ह्यांनुसार तीन गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. 153, 336, 427, 435, 109. 504, 506 R/W/S 149 IPC आणि U/S 2 (A) कर्नाटक प्रिव्हेन्शन ऑफ डिस्ट्रक्शन अँड लॉस ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट, 1881 नुसार त्यांना हिंडलगा कारागृहात कोठडीत पाठवले. बेळगाव पोलिसांनी श्री राम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, शुभम शेळके, अंकुश केसरकर, नरेश निलजकर, बेळगाव शहरातील लोकप्रिय युवा नेते मेघराजगुरव यांच्यावर संपूर्ण खोटा गुन्हा दाखल केला आहे. दगडफेकीच्या घटनांशी संबंधित नसलेल्या सर्व 27 नेत्यांवर/तरुणांवर वर नमूद केलेल्या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमाकांत कोंडुसकर, शुभम शेळके आणि इतर तरुणांनी कोणताही गुन्हा केलेला नसतानाही त्यांच्यावर भारतीय दंड विधानाच्या कलम 307 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमाकांत कोंडुसकर, शुभम शेळके आणि इतरांविरुद्ध अजामीनपात्र गुन्ह्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, म्हणजे त्यांना शांततापूर्ण आंदोलनात भाग घेण्यापासून परावृत्त करण्यासाठी आणि त्यांना सहजासहजी जामीन मिळणार नाही हे पाहण्यासाठी भारतीय दंड संहितेच्या कलम 307 हा अतिशय गंभीर मुद्दा आहे.
बेळगाव पोलिसांचा पूर्वीचा रेकॉर्ड पाहिला तर असे सहज लक्षात येते की, आपल्या राजकीय व्यक्तीला खूश करण्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊन निरपराध नागरिक, तरुणांवर अजामीनपात्र कलमांतर्गत गुन्हे दाखल करून त्यांना कारागृहात डांबून त्यांचा छळ करत आहेत. त्यामुळे निरपराध नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे/मानवी हक्कांचे या दडपशाहीत घोर उल्लंघन होत आहे. याबाबत गृहमंत्र्यांनी लक्ष घेऊन कर्नाटक पोलिसांनी चालविलेल्या या खोटा गुन्हा बाबत कारवाई करावी तसेच निरपराध युवकांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

उचगाव श्री मळेकरणी देवस्थान परिसरात यात्रा करण्यावर बंदी

Spread the love  उचगाव : उचगाव मळेकरणी देवस्थानमध्ये यापुढे पशुबळी देण्याच्या प्रथेला निर्बंध घालण्यात आले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *