राणी चन्नम्मा सर्कल येथे मानवी साखळीने समाजकंटकांचा धिक्कार
संकेश्वर (वार्ता) : संकेश्वरात आज संकेश्वर समस्त नागरिक व विविध संघटनांकडून पुकारण्यात आलेल्या संकेश्वर बंदला सर्व व्यापारी व्यावसायिकांनी, दुकानदारांनी नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला.
बेंगळूर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बेळगांव अनगोळ येथील क्रांतीवीर संगोळी रायण्णा पुतळा आणि बेळगांव खानापूर येथील श्री बसवेश्वर प्रतिमा विटंबना निषेधार्थ संकेश्वर बंद करुन समाजकंटकांना तीव्र शब्दांत निषेध नोंदविण्यात आला. गांधी चौक येथे विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने एकत्रित जमा होऊन मूक मोर्चाची सुरुवात करण्यात आली.
मोर्चा मार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमा, क्रांतीवीर संगोळी रायण्णा प्रतिमा, शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला आणि बसवेश्वर सर्कल येथील श्री बसवेश्वर पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
तद्नंतर चन्नम्मा सर्कल येथे मानवी साखळीने राष्ट्रपुरुषांच्या पुतळा विटंबनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदविण्यात आला. येथे नगरसेवक डॉ. जयप्रकाश करजगी, संजय नष्टी, अॅड. विक्रम कर्निंग, दिलीप होसमनी, संतोष पाटील यांनी पुतळा विटंबना प्रकरणात सहभागी समाजकंटकांना कडक शिक्षा करण्याबरोबर त्यांना हद्दपार करण्याची मागणी केली.
यावेळी समाजकंटकांवर कडक कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन माजी नगराध्यक्ष गजानन क्वळी, श्रीकांत हतनुरी, बसनगौडा पाटील, नगरसेवक अमर नलवडे, संजय नष्टी, संतोष मुडशी, दिलीप होसमनी यांचे हस्ते तलाठी लमाणी यांना देण्यात आले.
यावेळी सभापती सुनिल पर्वतराव, नगरसेवक रोहन नेसरी, चिदानंद कर्देण्णावर, डॉ. जयप्रकाश करजगी, राजेंद्र बोरगांवी, बसवराज बागलकोटी, राजू शिरकोळी, अविनाश नलवडे, मुस्तफा मकानदार, झाकीर मोमीन, मोसिन पठाण, युवराज पात्रोट, पिंटू सुर्यवंशी, अप्पा मोरे, पुष्पराज माने, राजेश गायकवाड, नागेश क्वळी, कुमार बस्तवाडी, आणप्पा संगाई, राहुल हंजी, सचिन सपाटे, बाबू भूसगोळ, संदिप गंजी, विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.
संकेश्वर बंद स्वयंप्रेरित असल्यामुळे मूक मोर्चाने निवेदन सादर केल्यानंतर गावातील दुकाने, हॉटेल, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेत्यांनी आपले व्यवहार पूर्ववत चालू केलेले दिसले. मानवी साखळीने तासभर जुना पुणे-बेंगळूर रस्ता रोको झाल्याने सदर मार्गावर ट्रॉफीक जाम झालेले चित्र पहावयास मिळाले.
