बेळगाव : उत्तर प्रदेशातील ज्ञानवापी मशिदीच्या तळमजल्यावर पूजा करण्यास परवानगी देण्याच्या निर्णयाच्या विरोधात बेळगावात एसडीपीआय संघटनेने निदर्शने केली. उत्तर प्रदेशातील ज्ञानवापी मशिदीच्या तळमजल्यावर पूजा करण्यास परवानगी देण्याच्या निर्णयाविरोधात बेळगावात एसडीपीआयने आंदोलन केले. 1991च्या प्रार्थनास्थळ कायद्यानुसार 15 ऑगस्ट 1947 तारखेला देशात अस्तित्वात असलेले कोणतेही धार्मिक स्थळ जसे आहे तसे सुरू ठेवावे, अशी तरतूद आहे. मात्र पूजेला परवानगी देऊन त्यांनी कायद्याचे उल्लंघन केले आहे, असा आरोप आंदोलकांनी केला. यावेळी बोलताना, एसडीपीआयच्या नेत्यांनी सांगितले की उत्तर प्रदेशातील ज्ञानवापी मशिदीच्या आवारात एक शिवलिंग सापडले म्हणून मशिदीच्या तळमजल्यावर पूजा करण्यास परवानगी देणे हे चुकीचे आहे. 1991 च्या कायद्यांचे हे उल्लंघन आहे.वाराणसीच्या जिल्हा न्यायाधीशांनी त्यांच्या निवृत्तीच्या एक दिवस आधी पूजेला घाईघाईने परवानगी देण्याचा घेतलेला निर्णयही अतिशय चिंताजनक आहे. सुमारे 400 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या मशिदीमध्ये नमाज अदा केली जाते. केवळ राजकीय सत्ता बळकावण्याच्या इच्छेचा भाग म्हणून ‘मशीद मंदिर’ वाद निर्माण करणाऱ्या शक्ती देशात द्वेष आणि हिंसाचाराला खतपाणी घालत आहेत, असे ते म्हणाले.
प्रार्थना स्थळ कायदा, 1991 नुसार, देशभरातील सर्व प्रार्थनास्थळांना पुरेसे संरक्षण दिले गेले पाहिजे आणि ते चांगल्या स्थितीत राखले गेले पाहिजे. ज्ञानवापी मशिदीवरून कोणत्याही कारणास्तव वाद निर्माण करण्याची परवानगी देऊ नये आणि ती पूर्णपणे वक्फ बोर्डाकडे सोपवावी अशी एसडीपीआयची मागणी आहे. आंदोलनात जिल्हाध्यक्ष मन्सूद मकानदार, उपाध्यक्ष मैनोद्दीन मुजावर, सरचिटणीस मोजा मुल्लाणी, सचिव झाकीर नायकवडी, कोषाध्यक्ष मुजफ्फर बागवान आदी उपस्थित होते.