Friday , December 8 2023
Breaking News

नियमांचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई : डीसीपी आमटे

Spread the love

बेळगाव (वार्ता) : नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जारी केलेल्या कोरोना संदर्भातील मार्गदर्शक सूचीचे आपण सर्वांनी काटेकोर पालन केले पाहिजे. त्याचे उल्लंघन करणार्‍यांवर राष्ट्रीय आपत्ती निवारण कायद्याअंतर्गत कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस उपायुक्त (डीसीपी) डॉ. विक्रम आमटे यांनी दिला आहे.
शहरातील आपल्या कार्यालयांमध्ये आज मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत प्रसंगी ते बोलत होते. नववर्ष स्वागत म्हणजे 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नवी कोरोना मार्गदर्शक सूची जारी केली आहे. त्यानुसार हॉटेल, रेस्टॉरंट, क्लब आदी सार्वजनिक ठिकाणी या मार्गदर्शक सूचीचे काटेकोर पालन केले जावे यासाठी संबंधित पोलीस ठाण्याचे अधिकारी जनजागृती करत आहेत. नववर्षानिमित्त येत्या 30 डिसेंबर ते 2 जानेवारीपर्यंत हॉटेल, रेस्टॉरंट, क्लब, बार, पब आदी ठिकाणी 50 पेक्षा जास्त लोक असता कामा नयेत. सदर नियमाचे उल्लंघन झाल्यास संबंधित मालक अथवा संयोजकांना जबाबदार करून कठोर कारवाई केली जाईल.
याखेरीज नियम उल्लंघनाचा प्रकार आढळल्यास महापालिका अधिकार्‍यांशी बोलून संबंधितांचा परवाना देखील रद्द केला जाईल. फेसमास्क, सॅनिटायझर आणि सामाजिक अंतराचा नियम काटेकोर पाळला जावा. यासाठी पोलिसांची विशेष पथके नेमण्यात आली असून या नियमांचे उल्लंघन झालेल्या आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असे डीसीपी आमटे यांनी स्पष्ट केले.
हॉटेल, रेस्टॉरंट, क्लब, बार, पब आदी ठिकाणी काम करणार्‍या सर्व कर्मचार्‍यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेले असणे अनिवार्य आहे. याची संपूर्ण जबाबदारी मालकाची असेल. त्याचप्रमाणे सभा, लग्नसमारंभात 300 पेक्षा जास्त लोकांची हजेरी राहता कामा नये. संबंधित ठिकाणी 300 पेक्षा जास्त लोक आढळल्यास राष्ट्रीय आपत्ती निवारण कायद्याअंतर्गत कायदेशीर कारवाई केली जाईल. महाराष्ट्रातून बेळगाव शहर आणि जिल्ह्यात येणार्‍यांसाठी बाची, चलुवेनट्टी, राकसकोप, बेक्किनकेरे चेकपोस्टच्या ठिकाणी कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र सादर करणे सक्तीचे असेल. तसेच त्यांच्याजवळ कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र असले पाहिजे. या चेकपोस्टच्या ठिकाणी महसूल, आरोग्य आणि पोलीस खात्याचे अधिकारी तैनात असतील, असे त्यांनी सांगितले.
राज्यभरात आजपासून जारी करण्यात आलेल्या नाईट कर्फ्यूच्या बाबतीत बोलताना डीसीपी डॉ. विक्रम आमटे म्हणाले की, बस, रेल्वे आणि विमान सेवा या काळात सुरू राहतील. मात्र खाजगी वाहनांच्या संचारावर रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत बंदी असेल. या कालावधीत खाजगी वाहनांना कोणत्याही कारणास्तव रस्त्यावर संचार करता येणार नाही.
विवाह, अंत्यसंस्कार आदींसाठी जाणार्‍यांनी तसेच स्पष्ट कारण व माहिती दिल्यास त्यांना परवानगी दिली जाईल. तसेच संबंधिताना कोरोना निगेटिव्ह आणि दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र दाखवावे लागेल. अत्यावश्यक सेवांना या काळात परवानगी असेल. मात्र नववर्ष स्वागताच्या पार्ट्यांसाठी कोणालाही जाऊ दिले जाणार नाही, असेही डॉ. आमटे यांनी स्पष्ट केले.

About Belgaum Varta

Check Also

टिप्पर -कारचा भीषण अपघात; दोघांचा जळून मृत्यू

Spread the love  बेळगाव : देवगिरी ते बंबरगा गावादरम्यानच्या चौकात टिप्पर आणि कार यांच्यात झालेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *