बेळगाव (वार्ता) : राज्यभरात काही दिवसात झालेल्या अनुचित घटनांना महाराष्ट्र एकीकरण समितीला जबाबदार धरून काही कन्नड संघटनांनी पुकारलेल्या कर्नाटक बंदला इतर काही कन्नड संघटनांनीच विरोध केला आहे. बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समिती सामाजिक शांतता बिघडविण्याचे कृत्य करत आहे, असा आरोप काही कन्नड संघटनांनी तसेच कन्नड आंदोलक वाटाळ नागराज यांच्या नेतृत्वाखाली करत येत्या 31 डिसेंबर रोजी कर्नाटक बंदची हाक दिली होती. परंतु आज कन्नड साहित्य भवन येथे झालेल्या बैठकीत इतर कन्नड संघटनांनी मात्र या बंदला नकार दिला आहे.
मंगळवारी कन्नड साहित्य भवन येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत कन्नड संघटना क्रिया समितीचे अध्यक्ष अशोक चंदरगी यांनी सदर बंदला काही संघटना वगळता इतर अनेक कन्नड संघटनांचा पाठिंबा नसल्याचे स्पष्ट केले. बेळगाव आणि राज्यात झालेल्या घटनांना ‘बंद’ हा पर्याय नसल्याचेही चंदरगी म्हणाले. यानंतर करवे संघटनेचे राज्य संचालक महादेव तलवार यांनी देखील या बंदला आपला पाठिंबा नसल्याचे स्पष्ट करत सातत्याने बंद पुकारणे हा पर्याय नसल्याचे मत व्यक्त केले. त्याचप्रमाणे करवेचे जिल्हाध्यक्ष दीपक गुडगनट्टी बोलताना म्हणाले, बेळगावमधील बहुतांशी कन्नड संघटनांनी बैठक घेतली आहे. बेळगावमधील कन्नड संघटनांनी 31 डिसेंबरच्या बंदला पाठिंबा दर्शविला नसून महाराष्ट्र एकीकरण समितीविरोधात राज्य सरकारवर दबाव आणण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
वाटाळ नागराज आणि काही कन्नड संघटनांनी पुकारलेल्या बंदला मात्र बेळगाव जल्ह्यातील कोणत्याही कन्नड संघटनांनी पाठिंबा दर्शविला नसल्याचे यावरून स्पष्ट होते.
Check Also
युवा आघाडीतर्फे उद्या सैन्यात भरती झालेल्या जवांनाचा सत्कार
Spread the love बेळगाव : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा आघाडीच्या वतीने उद्या बुधवार दिनांक …