बेळगाव : “जसे भगवान विश्वकर्मा हे जगाचे आर्किटेक्ट होते तसेच बांधकाम व्यावसायिक हे सुद्धा आजचे विश्वकर्माच आहेत. मानवाच्या तीन प्रमुख गरजा अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या असल्या तरीसुद्धा अन्न हे काही तासाचा आनंद देणारे, वस्त्र हे काही महिने आनंद देणारे तर घर हे अनेक वर्षे आणि काही वेळा पिढ्यानपिढ्या आनंद देणारे असते आणि म्हणून बिल्डर्सचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. बेळगाव क्रेडाईने हा चारदिवशीय भव्य इव्हेंट सादर करून एक नवा इतिहास निर्माण केला आहे” असे विचार क्रेडाईच्या पश्चिम भारत नॅशनल विंगचे उपाध्यक्ष सुनील फूरदे यांनी बोलताना व्यक्त केले.
बेळगाव क्रेडाईने बेल्कॉन या सीपीएड मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या चार दिवसीय प्रदर्शनाचा समारोप रविवारी रात्री सांगता समारमाने झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. सुनील फूरदे आणि मराठा लाईट इन्फंट्रीचे डेप्युटी कमांडंट कर्नल चंद्रनील रामनाथकर हे उपस्थित होते.
या भव्य समारोप सोहळ्याची सुरुवात क्रेडाई बेळगावचे अध्यक्ष दीपक गोजगेकर यांच्या प्रास्ताविकाने झाली. ‘दोन वर्षाच्या फरकाने सुरू झालेल्या या सातव्या प्रदर्शनामुळे बांधकाम व्यवसायाला एक नवा आयाम मिळाला आहे. या प्रदर्शनात सहभागी झालेल्या 140 स्टॉल्समुळे बांधकाम व्यवसायाला नवी गती मिळेल असा मला विश्वास वाटतो’ असे सांगितले.
उपस्थित पाहुण्यांचा परिचय व स्वागत राजेंद्र मुतकेकर यांनी केले. “या प्रदर्शनामुळे बांधकाम क्षेत्राला मोठा उजाळा मिळेल “असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बेल्कॉनचे इव्हेंट चेअरमन आनंद अकणोजी यांनी पाहुण्यांना पुष्पगुच्छ अर्पण करून त्यांचा सन्मान केला.
यावेळी बोलताना कर्नल चंद्रनील रामनाथकर यांनी क्रेडाई बेळगावचे कौतुक केले.” राष्ट्राच्या निर्मितीमध्ये क्रेडाईचे योगदान फार महत्त्वाचे आहे” असे सांगून ते म्हणाले की, “एकाच छताखाली सर्व काही उपलब्ध झाल्यामुळे बेळगावकरांना नवे घर बांधताना किंवा नवी वास्तू खरेदी करताना लागणाऱ्या सर्व गोष्टीचे ज्ञान आणि बांधकाम क्षेत्रातील नवनव्या शोधांचे ज्ञान मिळाले आहे. क्रेडाई म्हणजे क्रेडिबिलिटी आणि ही क्रेडिबिलिटी बिल्डर्स देऊ शकतात”.
यावेळी बोलताना या प्रदर्शनाचे आयोजक यश कम्युनिकेशन्सचे प्रकाश कालकुंद्रीकर म्हणाले की “अशा प्रकारचे भव्य प्रदर्शन हे केवळ क्रेडाईमुळे शक्य झाले. याही पुढे अशा पद्धतीचे राष्ट्रीय स्तरावरील इव्हेंट्स आपण साजरे करूया” असे सांगून त्यांनी ही संधी मिळाल्याबद्दल क्रेडाईचे आभार मानले. याप्रसंगी लहान मध्यम व मोठ्या आकाराच्या स्टॉल्समधील उत्कृष्ट स्टॉल निवडण्यात येऊन त्याचा पाहुण्यांचे हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. याचबरोबर या प्रदर्शनाचे प्रायोजक असलेल्या विक्रम टी एम टी, स्टेट बँक, तिरुपती बालाजी मार्बल, युनियन बँक व बालाजी काँक्रीट यासारख्या सर्व संस्थांना सन्मानित करण्यात आले.
क्रेडाईच्या महिला विंग आणि यंग ब्रिगेडने हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल त्यांचेही आभार मानण्यात आले. कार्यक्रमाचा समारोप करताना क्रेडाईचे खजिनदार प्रशांत वांडकर म्हणाले की ‘हे प्रदर्शन सर्वांच्या सामूहिक प्रयत्नातून यशस्वी झाले आहे”
याप्रसंगी व्यासपीठावर बेळगाव क्रेडाईचे सेक्रेटरी युवराज हुलजी, उपाध्यक्ष गोपाळराव कुकडोलकर, सचिन बैलवाड यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
निकाल पुढीलप्रमाणे –
मोठे स्टॉल गट -1) एस्ट्रोपिया 2) विक्रम टी एम टी 3) गणेश सिरॅमिक्स
मध्यम गट – 1) जग्वार 2) मेटालिका 3) ब्ल्यू स्मार्ट लहान गट – 1) हेला इन्फ्रा 2) प्रोटेक्टो मार्केटिंग 3) ओजस द एलिमेंट
बिल्डर्स गट– 1) आनंद इन्फ्राबिल्ड 2) अमर कन्स्ट्रक्शन 3) अथर्व कन्स्ट्रक्शन