
बेळगाव : गतसाली पाऊस कमी झाला असल्याने यावर्षी भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे ही गोष्ट लक्षात घेऊन प्रत्येकाने पाण्याचा जपून करण्याची आणि पाण्याचा अपव्यय टाळण्याची गरज आहे. यासाठी गोवावेस येथील न्यू गर्ल्स हायस्कूल आणि गव्हर्नमेंट मराठी बॉईज स्कूल क्रमांक 25 च्या विद्यार्थ्यांची एक रॅली शनिवारी सकाळी वार्ड क्रमांक 29 चे नगरसेवक श्री. नितीन जाधव यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली.
80 हुन अधिक विद्यार्थी सहभागी झालेल्या या रॅलीने पाणी वाचवण्याचा संदेश देणाऱ्या घोषणा देत शहापूर भागात नागरिकांच्या मध्ये जागरूकता केली. त्यानंतर शाळा क्रमांक 25 च्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात नगरसेवक नितीन जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक कार्यक्रम झाला. ज्यामध्ये नगरसेवक गिरीश धोंगडी, बेळगावला पाणीपुरवठा करणाऱ्या एल अँड टी कंपनीचे रवीकुमार, त्याचबरोबर प्रोजेक्ट मॅनेजर धीरज आणि कोरे गल्लीचे पंच कलापान्ना हंडे आदी उपस्थित होते.
प्रारंभी उपस्थितांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक आर् बी बचनेट्टी यांनी केले त्यानंतर एल अँड टी कंपनीचे धीरज यांनी दोन्ही नगरसेवकांना पुष्पगुच्छ अर्पण करून त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी बोलताना ‘आज पाणी वाचवले तर ते उद्यासाठी उपयोगी येणार आहे हा मेसेज विद्यार्थ्यांनी घरोघरी जाऊन द्यावा’ असे आवाहन एल अँड टी कंपनीचे रवीकुमार यांनी केले.
“विद्यार्थ्यांनी पाणी वाचविण्याबरोबरच येत्या पावसाळ्यात आपल्या घरासमोर एक झाड लावून त्याचा सेल्फी काढून माझ्याकडे पाठवावा, पाच वर्ष तुम्ही त्या झाडाचे संगोपन केला तर मी तुम्हाला दरवर्षी प्रत्येकी शंभर रुपये बक्षीस देतो अशी घोषणा नितीन जाधव यांनी केली. या कार्यक्रमास या भागातील अनेक नागरिक, कोरे गल्ली तील पंच गजाभाऊ सावंत, पांडुरंग शिंदे शाळेचे शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमात न्यू गर्ल्सचे मुख्याध्यापक ज्योतिबा घाडी यांच्यासह सहकारी सहभागी झाले होते.
Belgaum Varta Belgaum Varta