
बेळगाव : राज्यातील काँग्रेस सरकारच्या कुप्रशासनाचा निषेध करण्यासाठी प्रदेश भाजप युवा मोर्चाच्या वतीने बेळगावात तिरंगा पदयात्रा काढण्यात आली.
काँग्रेसचे खासदार डी. के. सुरेश यांच्या देशाच्या फाळणीच्या वक्तव्याचा आणि विधानसौधमधील पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणांचा निषेध करत, भारताची अखंडता आणि सार्वभौमत्व जपण्यासाठी भाजप युवा मोर्चातर्फे शहरात तिरंगा रॅली काढण्यात आली. ही रॅली रामदेव सर्कलपासून सुरू होऊन चेन्नम्मा सर्कलपर्यंत निघाली. युवामोर्चा कार्यकर्त्यांनी संपूर्ण रॅलीत हिंदुस्थान जिंदाबादच्या घोषणा दिल्या.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना बेळगाव महानगर युवा मोर्चाचे अध्यक्ष महादेव दरीयण्णवर म्हणाले की, राज्यात दोन ते तीन महिन्यांपासून जातीय दंगली, पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा आणि देश फाळणीच्या विधानांमुळे विद्वेषाचे वातावरण निर्माण होत आहे. काँग्रेस सरकारच्या कुप्रशासनामुळेच अशा घटनांत वाढ होत आहे. याचा निषेध करत भाजप युवा मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात तिरंगा रॅली काढून देशाचे रक्षण आपल्यासाठी महत्त्वाचे असल्याचा संदेश देण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी इरण्णा अंगडी, महांतेश वकुंद, चेतन बडिगेर, महेश मरगमर आदी कार्यकर्ते सहभागी झाले.
Belgaum Varta Belgaum Varta