निपाणी (वार्ता) : रामदुर्ग तालुक्यातील ३७ ग्राम पंचायतीमध्ये २८ कोटीचा भ्रष्टाचार झाला आहे. त्याच्या चौकशीसाठी रयत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी (ता.५) बेळगाव जिल्हा पंचायत कार्यालयासमोर उपोषण चालू केले होते. जिल्हा पंचायत अधिकाऱ्यांनी चौकशी करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण तात्पुरते मागे घेण्यात आले.
रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार म्हणाले, रामदुर्ग तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. त्याच्या चौकशीसाठी बऱ्याचदा निवेदने दिली होती. पण आज पर्यंत चौकशी न झाल्याने ग्रामस्थासह रयत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषण चालू केले होते. उपोषणाची तीव्रता पाहून जिल्हा पंचायत अधिकाऱ्यांनी उपोषण स्थळी भेट घेऊन चौकशी करण्याचे आश्वासन दिले. यापुढील काळात तात्काळ चौकशी करून संबंधितावर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.
त्यावेळी संघटनेचे राज्याध्यक्ष चुनाप्पा पुजारी, श्रीनिवासगौडा पाटील, शिवाजी कागीनकर, वासू पांढरोळी, विठ्ठल बसलींगगुडी, राघवेंद्र नाईक, संजू जोकनट्टी, प्रकाश नाईक, पांडू बिरनगड्डी रयत संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.