(३)
सीमाभागात एकीकडे कर्नाटक सरकारच्या वरदहस्ताने कानडी उच्छाद वाढला असताना कर्नाटकची गुलामी करण्यात धन्यता मानणाऱ्या लाचार लोकांची सुद्धा मिजास वाढली आहे. त्याचाच परिणाम की काय हजारो लोकांच्या समक्ष अश्याच एका लाचाराची मराठी माणसाला अपमानित करण्याची मजल गेली. पण ज्या मातीत आणि लोकांच्या मनामध्ये मराठी आणि महाराष्ट्र नांदतो ती मने शांत कशी बसतील? मराठी माणसाचा रुद्रावतार दाखवत त्या लाचार माणसाची पळता भुई थोडी झाली आहे.. पार गल्ली पासून जिथे जिथे मराठी माणूस आहे तिथपर्यंत त्यांची नाचक्की झाली आहे.
एकंदर या घटनेनंतर सीमाभागात कमालीचा स्वाभिमान चेतला आहे. गल्लो गल्ली मराठी भाषा आणि मराठी माणसाला मिळणाऱ्या अपमानकारक वागणुकीची चर्चा आता सुरू झाली आहे. एकीकडे प्रशासनाने चालवलेला कानडी सक्तीचा वरवंटा तर दुसरीकडे स्वतःला मराठी म्हणून मिरविणाऱ्या लाचाराच्या वागणुकीमुळे सीमाभागातील मराठी जनतेत पुन्हा एकदा मराठी स्वाभिमान उफाळून आला आहे. समिती असताना मराठी भाषा आणि माणूस याला मिळणारी वागणूक आणि आता झालेली दयनीय अवस्था यातील फरक आता लोक बोलू लागले आहेत. त्याचाच एक प्रत्यय काल बेळगावात स्थापन झालेल्या डिजिटल न्यूज असोसिएशनच्या उद्घाटन सोहळ्यात दिसून आला. डिजिटल वार्तांकन करणाऱ्या संपादकांची एक संघटना बेळगावमध्ये नव्याने स्थापन करण्यात आली. यावेळी डिजिटल पोर्टल चालवणाऱ्या ज्येष्ठ संपादकांचा सन्मान देखील करण्यात आला. सीमाभागात वर्तमान पत्र असो किंवा डिजिटल वार्तांकन असो दोन्ही ठिकाणी मराठी भाषिकांची निर्विवाद मक्तेदारी आहे तरी देखील कार्यक्रमाच्या नामफलकावर मराठीला स्थान देण्यात आले नव्हते. त्यामुळे बेळगावमधील आघाडीच्या डिजिटल पोर्टलचे संपादक प्रकाश बिळगोजी, उपेंद्र बाजीकर, सुहास हुद्दार यांनी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना चूक निदर्शनास आणून दिली. आणि आयोजकांनी सुद्धा पुढल्या वेळी अशी चूक होणार नाही आणि फलकावर मराठीमध्ये सुद्धा लिहले जाईल याची ग्वाही दिली. मराठी भाषेचा स्वाभिमान आणि आग्रह आता आपण धरल्याशिवाय मराठीला गतवैभव मिळणार नाही याची जाणीव आता सर्व स्तरातून निर्माण होत आहे.
मराठी भाषेचा पेटणार हा वणवा आता शांत झाला नाही पाहिजे. नाहीतर कर्नाटकी डोमकावळे मराठीचा कधी घास घेतील माहीत नाही. जागा झालेला हा मराठी स्वाभिमान असाच कायम रहावा तरच मराठीला सीमाभागात गत वैभव प्राप्त होईल.