येळ्ळूर : हिंदवी स्वराज्य संघटनेच्या वतीने व येळ्ळूर ग्रामस्थांच्या सहकार्यातून महाराष्ट्र चौक येळ्ळूर या ठिकाणी 19 फेब्रुवारी 2024 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य अशी अश्वारूढ पंचधातूची मूर्ती उभी करण्यात आली. हिंदवी स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमातून तसेच येळ्ळूर ग्रामस्थांच्या सहकार्यातून गेल्या बारा वर्षांपासूनचे येळ्ळूरवासियांचे स्वप्न साकार झाले, अन हजारो नागरिकांच्या डोळ्याचे पारणे फिटले, सर्वांचा उर भरून आला आणि अवघे येळ्ळूर शिवमय झाले. दिमाखदार असा प्राणप्रतिष्ठापना सोहळाही पार पडला. अशी ही मोलाची कामगिरी केल्याबद्दल हिंदवी स्वराज्य संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांचा गौरव महाराष्ट्र हायस्कूलच्या वतीने करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाज शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष रवींद्र गिंडे होते. तर पाहुणे म्हणून संघटनेचे अध्यक्ष प्रशांत मजुकर, समाज शिक्षण संस्थेचे संचालक रावजी पाटील व पुंडलिक मेणसे होते. तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा. सी. एम. गोरल उपस्थित होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन हिंदवी स्वराज्य युवा संघटनेचे अध्यक्ष प्रशांत मजुकर व उपस्थित कार्यकर्त्यांच्या हस्ते करण्यात आले. हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागत गीत गायिले. मुख्याध्यापक बी. पी. कानशिडे यांनी प्रस्ताविक व स्वागत केले. त्यानंतर हायस्कूलच्या वतीने उपस्थित सर्व कार्यकर्त्यांचा गुलाब पुष्प देऊन गौरव मुख्याध्यापक बी. पी. कानशिडे यांनी केला. यावेळी बोलताना प्रा. सी. एम. गोरल म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवार चालविली, रणांगण गाजविले, शेकडो वर्षाची गुलामगिरी नष्ट केली, आपण लढू शकतो व जिंकू ही शकतो हे त्यांनी दाखवून दिले, मानवी मूल्ये, प्रजाहित, महिला व मुलाबाळाविषयी विशेष काळजी हे महाराजांच्या राज्यकारभाराचे वैशिष्ट होते, ते समतेचा विचार जोपासणारे पर्यावरणवादी विचार करणारे तत्त्ववेत्ते राजे होते. हे विविध संदर्भ देऊन त्यांनी सांगितले. यावेळी प्रशांत मजुकर यांनी सुरुवातीपासून प्राणप्रतिष्ठापना होईपर्यंतची वाटचाल कथन केली. संचालक रावजी पाटील यांनीही कार्यकर्त्यांचा गौरव केला. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष परशराम पाटील, कार्याध्यक्ष अश्विन कुमार मालूचे, सचिव चांगदेव मुरकुटे, उपसचिव राहुल उडकेकर, खजिनदार दिनकर घाडी उपखजिनदार मारुती शहापूरकर, ग्रामपंचायत सदस्य राकेश परीट, जोतिबा उडकेकर, अनिल पाटील, रघुनाथ मुरकुटे, किरण पाटील, नारायण दळवी, शिक्षिका लता बस्तवाडकर, भावना घाडी यांच्यासह संघटनेचे 25 कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन शिक्षक अनिल हुंदरे यांनी केले, तर आभार के. बी. पोटे यांनी मानले.