
(४)
गेल्या काही वर्षात सीमाभागात राष्ट्रीय पक्षांच्या वाढत्या प्रभावामुळे समितीकडे संधी म्हणून पाहणाऱ्या लोकांची संख्याही वाढत गेली आणि सोबत समितीत संधी मिळत नाही म्हणून राष्ट्रीय पक्षांचे जोडे उचलणाऱ्या लोकांची संख्याही वाढत गेली. गट तट, आर्थिक आरोप अशी वरवरची कारणे सांगून समितीवर चिखलफेक करून स्वार्थासाठी आणि स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी राष्ट्रीय पक्षांचे गुणगान गाणाऱ्या कार्यकर्त्यांची तर फौजच तयार झाली. निवडणुका आल्या की मी कसा समितीचा आणि मी काय काय केलं हे सांगणारे नकली निष्ठावंत देखील थोडे नाहीत. इतर वेळी समितीच्या कोणत्याही बैठकीत न दिसणारे कोणत्याही आंदोलनात सहभागी न होणारे टीकाकार समितीवर स्वतःच्या निष्ठेची गप्पा मारताना गल्लीच्या कट्यावर दिसले नाहीत तर नवल वाटेल. ऐन निवडणुकीत राष्ट्रीय पक्षांना उघड किंवा छुपी मदत करून लढ्यासाठी किती प्रामाणिक असल्याच्या बतवण्या मारणारे आता अधिक झालेत. आता तर गेल्या काही वर्षात समितीवर दबाव टाकून स्वतःच्या मर्जीतील लोकांची नेते म्हणून नावे उचलून धरण्याची प्रथा सुरू झाली आहे. विषय सोडून काहीचे गुणगान करणे आणि हीच व्यक्ती कशी योग्य आहे हे पटवून देणाऱ्या काही लोकांमुळे समितीमध्ये निष्ठावंताची कुचंबणा होत आहे. निवडणुका जवळ आल्या या अश्या आणि समितीचा फायदा घेणाऱ्या लोकांची भाऊगर्दी पाहायला मिळते. भरडला जातो तो प्रामाणिकपणे लढ्यासाठी काम करणारा, एक दिवस संयुक्त महाराष्ट्र होईल या आशेने झटणारा सामान्य कार्यकर्ता.. कारण या सामान्य माणसाकडे निष्ठा आहे पण पैसा नाही या एकमेव कारणासाठी त्याला पुढे येण्यापासून डावललं जात आणि पैशाच्या बळावर फुशारकी मारणाऱ्या लोकांची नेते होण्यासाठी चढाओढ पाहायला मिळते. लढ्याप्रती असणाऱ्या प्रामाणिकपणामुळे कुणीतरी का असेना समितीसाठी शेवटपर्यंत साथ देणार म्हणून निष्ठावंत मात्र अश्या पद प्रतिष्ठेपासून दूर राहतो. पण या सगळ्याला कुठेतरी पूर्णविराम मिळणे गरजेचे आहे. निवडणुकीत मिळालेल्या मतामुळे कुणी मोठा होत नाही किंवा कोणते पद दिले म्हणून मोठा होत नाही. कारण ही मते आणि पद देणारी सामान्य निष्ठावंत जनता असते आणि ती मोठी असते. याची जाणीव आजच्या घडीला सर्वांना होणे गरजेचे आहे. समितीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची मते दुसऱ्या कुणाला जात नाहीत. माणूस मेल्यावरच ती मते कमी होतील एवढी कट्टर मते समितीची आहेत. त्यामुळे मिळालेल्या पद आणि मतांची बढाई निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या पचनी पडत नाही. म्हणूनच आता समितीची स्वच्छ प्रतिमा निर्माण करायची झाल्यास निष्ठावंत आणि निस्वार्थी व्यक्तीला समितीचे नेतृत्व करण्याची संधी दिली गेली पाहिजे. नवीन लोकांच्या भरती करण्यासंदर्भात केलेल्या मागणीची पूर्तता हल्लीच झाली असताना या सगळ्याचे नेतृत्व समितीची, लढ्याची जाण असलेल्या व्यक्तींची गरज आहे. उतावीळ निर्णय घेवून समितीची कार्यपद्धती चव्हाट्यावर मांडणाऱ्या लोकांपेक्षा संयमाने कर्नाटकी डावपेचांचा सामना करत समितीच्या लढ्यासंदर्भातील घडामोडी गुप्तपणे गनिमी काव्याने पुढे नेणारी व्यक्ती आज लढ्याला हवी आहे आणि ती तीच व्यक्ती असू शकते ज्याला लढ्याची तळमळ आणि लढ्याचा अभ्यास आहे. म्हणूनच लिहावे लागले समितीला संधीसाधूंची नाही तर गरज निष्ठावंत नेतृत्वाची….
Belgaum Varta Belgaum Varta