बेळगाव : दुकाने-आस्थापनांच्या नामफलकांवर 60% जागेत कन्नडमध्ये तर उर्वरित 40% जागेत मराठी भाषेत मजकूर लिहिता येईल असे बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी आज स्पष्ट केले.
राज्यातील दुकाने-आस्थापनांच्या नामफलकांवर 60% जागेत कन्नडमध्ये तर उर्वरित 40% जागेत अन्य भाषांत मजकूर लिहिता येईल असे विधेयक कर्नाटक विधिमंडळाने नुकतेच मंजूर केले आहे. त्यानंतर बेळगावात मराठी भाषिकांना लक्ष्य करणाऱ्या कानडी संघटनांच्या कार्यकर्त्यांना भलताच चेव आला आहे. त्यांनी महापालिकेवर दबाव आणून सर्वच कन्नडेतर नामफलक काढून टाकण्यासाठी मोहीम राबवली आहे. बोर्ड काढून घेण्याची व नव्या नियमानुसार बोर्ड बसवण्याची नोटीस न देताच सरसकट कशाही पद्धतीने बोर्ड काढण्यात येत आहेत. त्यामुळे व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होत आहे. या संदर्भात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने आज शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले.
यासंदर्भात माहिती देताना महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रणजित चव्हाण-पाटील म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून बेळगाव व परिसरातील दुकाने-आस्थापनांचे नामफलक काढण्याची मोहीम महापालिकेने राबवली आहे. पण हे बोर्ड काढण्याची पद्धत कोणालाही राग येण्यासारखीच आहे. यात अधिकारी कमी व गुंडच जास्त असाही प्रकार दिसतो आहे. याबाबत आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन हे सर्व त्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आमचे म्हणणे ऐकून सरसकट बोर्ड न हटवता व्यावसायिकांना कायदेशीर नोटीस देण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय आमची या भागात 15%हुन अधिक लोकसंख्या असल्याने भाषिक अल्पसंख्यांक कायद्यानुसार आम्हाला सरकारी परिपत्रके, कागदपत्रे आमची मातृभाषा मराठीतून देण्याची विनंती जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. त्यांनी दुकाने-आस्थापनांच्या नामफलकांवर 60% जागेत कन्नडमध्ये तर उर्वरित 40% जागेत मराठी वा अन्य भाषेत मजकूर लिहिता येईल असे स्पष्ट करून पालिका आयुक्तांना तसे निर्देश दिले आहेत. तसेच अशा विषयांवर यापूर्वीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी म. ए. समितीच्या नेत्यांना बोलावून चर्चा केली होती. त्या बैठकांचे इतिवृत्त आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहोत. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनीही अशा बाबतीत म. ए. समितीच्या नेत्यांना बोलावून चर्चा करण्याचे आश्वासन दिले असल्याचे सांगितले.
यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर, ऍड. अमर येळ्ळूरकर, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, विकास कलघटगी, म. ए. युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, येळ्ळूर ग्राम पंचायतीचे माजी अध्यक्ष सतीश पाटील, प्रशांत भातकांडे, गणेश दड्डीकर, प्रमोद पाटील, सूरज कणबरकर, धनंजय पाटील, रोहन लंगरकांडे, उदय पाटील, विशाल कंग्राळकर यांच्यासह महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.