Sunday , January 12 2025
Breaking News

कन्नड फलक प्रकरणी; जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या मनपा आयुक्तांना सूचना

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे नामफलकावरील 60 टक्के कन्नड सक्तीसाठी केली जाणारी जबरदस्ती आज सोमवारपासून तात्काळ थांबवण्यात येईल असे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिले असून तशी सूचना त्यांनी महापालिका आयुक्तांनाही दिली आहे. यामुळे शहरातील दुकानदार, व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

अलीकडे बेळगाव शहरात नामफलकावरील कन्नड सक्तीचा वरवंटा फिरविला जात आहे. राज्य सरकारच्या नामफलकावर 60 टक्के कन्नड आणि उर्वरित 40 टक्क्यात इतर भाषा या कायद्याची महापालिकेकडून कोणतीही पूर्वसूचना न देता जबरदस्तीने मनमानी अंमलबजावणी केली जात आहे. हे करताना हजारो रुपये खर्च केलेल्या नामफलकांचे नुकसान केले जात आहे.

परिणामी शहरातील समस्त व्यापारी, दुकानदारांकडून या कृतीचा निषेध केला जात आहे. ही कन्नड सक्तीची कारवाई थांबवावी यासाठी पाठपुरावा करत असलेल्या शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने गेल्या शुक्रवारी रणजित चव्हाण पाटील रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले होते. तसेच कशाप्रकारे पूर्व सूचना न देता कायद्याच्या चौकटी बाहेर कन्नड सक्तीच्या कायद्याची अंमलबजावणी केली जात आहे. याचा व्हिडिओ दाखवून माहिती दिली होती. त्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी देखील नाराजी व्यक्त करून सदर प्रकार थांबवण्याचे आश्वासन दिले होते. तसेच समिती पदाधिकाऱ्यांसमोरच त्यांनी महापालिका आयुक्त लोकेश यांच्याशी संपर्क साधून महापालिकेची इतर महत्त्वाची कामे असताना तुमच्याकडून शहरात हे काय चालले आहे? अशी विचारणा केली. त्याचप्रमाणे कायद्याच्या चौकटीत कारवाई करा आणि दुकानदार, व्यापाऱ्यांना कन्नड सक्ती कायद्याच्या अंमलबजावणीसाठी मुदत द्या, अशी सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी मनपा आयुक्तांना केली होती.

मात्र लगेच दुसऱ्या दिवशी गेल्या शनिवारी आणि रविवारी खडेबाजार, मारुती गल्ली व इतर ठिकाणी पालिका कर्मचाऱ्यांकडून दुकानांवरील नामफलक उतरवण्याचा प्रकार सुरूच होता. याबद्दल खडेबाजार आणि गणपत गल्ली व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तात्काळ महाराष्ट्र एकीकरण समितीचे जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी यांच्याशी संपर्क साधला.

त्यांनी लागलीच जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून घडल्या प्रकाराची माहिती दिली आणि त्याचा व्हिडिओही पाठवून निदर्शनास आणून दिला. त्याची दखल घेत कलघटगी यांच्याशी संपर्क साधला तात्काळ आयुक्तांशी देखील संपर्क साधला. यावेळी त्यांनी महापालिकेचे सर्व अभियंता, बीट पर्यवेक्षक आणि आरोग्य निरीक्षक यांना कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर कृत्य न करण्याचे निर्देश द्या.

आचारसंहिता भंग करणारे फलक काढा, मात्र नाम फलकावरील 60 टक्के कन्नड सक्तीची अंमलबजावणी कायद्याच्या चौकटीत करा अशी सूचना महापालिका आयुक्तांना केली. तसेच उद्या सोमवारपासून शहरातील दुकाने व व्यापारी आस्थापनांवरील नामफलक जबरदस्तीने उतरविले जाणार नाहीत, असे आश्वासन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी विकास कलघटगी यांना दिले. जिल्हाधिकाऱ्यांच्या या आश्वासनामुळे शहरातील दुकानदार आणि व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला असून त्यांच्या समाधान व्यक्त होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक संचालकावर दडपशाहीचा आरोप…

Spread the love  बेळगाव : समाजकल्याण विभागाकडून दडपशाहीचा आरोप असलेल्या तालुका अधिकाऱ्याच्या बदलीची मागणी दलित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *