
शेतकऱ्यांनी दिला उग्र आंदोलनाचा इशारा
बेळगाव : उच्च न्यायालयाची स्थगिती उठल्याचे सांगून पोलीस बंदोबस्तात सुरु केलेल्या हलगा-मच्छे बायपास रस्त्याच्या बांधकामाला शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला आणि सुपीक शेतजमीन जप्त केल्याचा आरोप करत निषेध केला. हलगा मच्छे बायपास दरम्यानची शेतकऱ्यांची सुपीक जमीन सरकरने संपादित केली. या विरोधात शेतकऱ्यांनी न्यायालयात जाऊन या रस्त्याच्या बांधकामासाठी स्थगिती मिळवली होती. मात्र आता न्यायालयाचा स्थगिती आदेश रद्द करण्यात आल्याचे सांगून चुकीची कागदपत्रे शेतकयांना दाखवून हलगा-मच्छे बायपास रस्त्याचे काम सुरू करण्यात आल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन केले. रस्त्याच्या बांधकामापूर्वी ज्या जमिनीचे सर्वेक्षण करण्यात आले होते तसेच सुपीक शेतजमिनी जप्त केल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी आंदोलन केले. यावेळी हलगा मच्छे बायपास रस्ता बंद करा अशा घोषणा देण्यात आल्या.
शेतकरी नेते रवी पाटील म्हणाले की, या भागात सुपीक जमीन आहे. येथे रस्ता तयार करू नका, असे आम्ही अधिकाऱ्यांना आधीच सांगितले आहे. मात्र, महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी सक्तीने जमीन ताब्यात घेत आहेत, ही गरीब शेतकऱ्यांची जमीन आहे, येथील शेतकऱ्यांकडे 1 एकर, अर्धा एकर जमीन आहे, 200 हून अधिक लोकांच्या जमिनी आहेत, एकाही शेतकऱ्याला पैसे मिळाले नाहीत.
शेतकरी नेते राजू मरवे यांनी हलगा मच्छे यापूर्वी सर्वेक्षण केलेल्या जमिनी तसेच सुपीक शेतजमिनी जप्त केल्याचा आरोप केला. या रस्त्याच्या विरोधात न्यायालयातून स्थगिती आदेश मिळाला आहे. मात्र अधिकाऱ्यानी आम्हाला चुकीची माहिती देऊन रस्त्याचे कामकाज जबरदस्तीने सुरु केले आहे. जर स्थगिती रद्द केली असती तर आमच्या वकिलांना तसे आदेश पत्र मिळाले असते मात्र अधिकारी शेतकऱ्यांची दिशाभूल करून आमची ह्या रस्त्याचे काम करीत आहेत ते ताबडतोब बंद करावे. या भागातील शेतकरी अल्पभूधारक आहेत. बेकायदेशीर बायपास रस्ता करीत असताना सरकारने शेतकऱ्यांचा कोणताही विचार न करता शेतकऱ्यांच्या छाताडावर नाचत आमच्या काळ्या जमिनीत बायपास करून शेतकऱ्यांना कंगाल करण्याची वेळ आणली आहे. हा अन्याय आहे. आम्ही २००२ सालापासून आम्ही शेतकरी या विरोधात लढा देत आहोत. आम्ही उच्च न्यायालयात देखील या विरोधात याचिका दाखल केली. शेतकऱ्यांवरील या अन्यायाविरोधात आम्ही उग्र आंदोलन छेडणार आहोत. चन्नम्मा सर्कलपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत लोटांगण घालत आंदोलन करण्याच्या इशारा त्यांनी दिला. यावेळी शेतकऱ्यांसहित महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Belgaum Varta Belgaum Varta