Tuesday , March 3 2026
Breaking News

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याकडून आचारसंहितेचा भंग

Spread the love

 

बेळगाव : महिला व बालकल्याण आणि दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक सक्षमीकरण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर हे आपल्या अधिकाराचा आणि सरकारी यंत्रणेचा गैरवापर करत असून हा आचारसंहितेचा भंग असल्याची लेखी तक्रार बेळगाव ग्रामीण मंडळ भाजप अध्यक्ष धनंजय जाधव यांनी सहायक निवडणूक अधिकारी बेळगाव ग्रामीण यांच्याकडे केली आहे.
विद्यमान महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी अंगणवाडी कार्यकर्त्या, पर्यवेक्षक तसेच आशा कार्यकर्त्या आणि पर्यवेक्षक यांची बैठक बोलावून जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी कार्यकर्त्यांना या बैठकीस हजर राहण्याचे आदेश बजावण्यात आले होते. त्यांच्या वाहतुकीची व्यवस्थाही करण्यात आली होती. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर या अंगणवाडी व आशा कार्यकर्त्यांना गाव पातळीवर काँग्रेस प्रचारासाठी आपल्या वैयक्तिक वाहनातून घेऊन जाणार होत्या. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर आपल्या राजकीय शक्तीचा वापर करून कार्यकर्त्यांवर दबाव आणत अधिकृत यंत्रणेचा गैरवापर करत आहेत, असा आरोप धनंजय जाधव यांनी केला आहे.
मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची ही कृती आचारसंहितेचा भंग करणारी आहे. अंगणवाडी कार्यकर्त्यांना सरकारकडून मानधन मिळते आणि मंत्री मात्र आपल्या अधिकाराचा गैरवापर करत अंगणवाडी कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या बैठकीत हजर राहण्यास सांगत आहेत. हे मुक्त आणि निष्पक्ष निवडणूक संकल्पनेच्या विरुद्ध असून अधिकृत यंत्रणेचा सत्ताधारी पक्षांकडून गैरवापर करण्यात येत आहे.
मंत्री महोदयांनी आपल्या अधिकृत भेटी निवडणुकीच्या कामाशी जोडू नयेत त्याचप्रमाणे निवडणुकीच्या कामावेळी अधिकृत अथवा वैयक्तिक यंत्रणेचा वापर करू नये असे आचारसंहिता सांगते. भारतीय संविधानाच्या कलम 324 नुसार भारतीय निवडणूक आयोग आदर्श आचारसंहिता लागू करू शकतो आणि तिचा भंग करणाऱ्या उमेदवारावर बंदी घालू शकतो. त्यामुळे पक्षाची विनंती आहे की, निवडणूक आयोगाने आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर आणि काँग्रेस पक्ष यांच्या विरोधात योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळचे अध्यक्ष धनंजय जाधव यांनी सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांकडे एका तक्रारीद्वारे केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *