
बेळगाव : बेळगाव शहर आणि परिसरात आज जल्लोषात रंगोत्सव साजरा करण्यात आला. सोमवारी सकाळपासूनच रंगीबेरंगी रंगांची उधळण करत गल्लोगल्ली रंगोत्सवाला उधाण आले होते.
शहरातील गणपत गल्ली, मारुती गल्ली, खडेबाजार, कॉलेज रोड, सीपीएड मैदानावर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. अनेक ठिकाणी रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा लाभ घेत बेळगावकर रंगात न्हाऊन निघाले होते.
एरव्ही सायंकाळपर्यंत रंगोत्सव साजरा करणारी गर्दी मात्र परीक्षांच्या पार्श्वभूमीवर दुपारपासूनच काहीशी कमी झाल्याचे जाणवले. तरुणाईने मात्र विविध ठिकाणी आयोजिलेल्या डीजेवर देहभान विसरून थिरकत रंगोत्सवाचा मनमुराद आनंद लुटला.
शहरासह उपनगरात काल सायंकाळी पारंपरिक पद्धतीने होळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आल्यानंतर आज सोमवारी सकाळी धुळवड देखील जल्लोषात आणि शांततेने साजरी करण्यात आली. यंदाच्या रंगोत्सवामध्ये युवा पिढीचा सहभाग लक्षणीय दिसत होता. आज सकाळपासून गल्लोगल्ली युवक युवतींसह शहरवासीय रंगांची उधळण करत सणाचा आनंद लुटत होते.
खडक गल्ली, चव्हाट गल्ली, टिळकवाडी आदी ठिकाणी डीजे लावून संगीताच्या तालावर सामूहिक रंगपंचमी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झालेला युवावर्ग डीजेच्या तालावर रंगाची उधळण करत बेभान होऊन नृत्य करताना दिसत होता. रंगपंचमीमुळे चव्हाट गल्ली, खडक गल्लीसह बऱ्याच ठिकाणचे रस्ते रंगानी न्हाऊन निघाले होते.

रंगपंचमीनिमित्त दरवर्षीप्रमाणे पांगुळ गल्ली येथील श्री अश्वत्थामा मंदिरासमोर मागणीसाठी व नवस फेडण्यासाठी आयोजित सामूहिक लोटांगणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भर उन्हाळा असून देखील या कार्यक्रमात बहुसंख्य स्त्री -पुरुष भाविक सहभागी झाले होते. उन्हाने तापलेल्या रस्त्यामुळे त्रास होऊ नये यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांकडून भक्तीभावाने लोटांगण घालणाऱ्या भाविकांवर सतत पाण्याची फवारणी केली जात होती. एकंदर शहर परिसरात आज सकाळी अपूर्व उत्साहात रंगपंचमीचा सण साजरा करण्यात आला.
Belgaum Varta Belgaum Varta