बेळगाव (वार्ता) : बेळगाव ते धारवाड व्हाया कित्तूर या नवीन रेल्वे लाईनला परवानगी मिळाली असली तरी या टप्प्यातील सुपीक जमिनी देणार नाही असा पवित्रा शेतकर्यांनी घेतला आहे.
त्याविरोधात सुपीक शेतजमिनीच्या मालक असलेल्या शेतकर्यांनी सोमवारी बेळगावात मोर्चा आयोजित केला आहे. या मोर्चाच्या माध्यमातून या रेल्वेमार्गाचा प्रचंड मोठा विरोध केला जाणार आहे.
पर्यायी रेल्वे मार्ग करा नापीक जमिनीतून रेल्वे लाईन घालण्यास आमची परवानगी आहे. मात्र सुपीक जमिनीतून कोणत्याही प्रकारे रेल्वेमार्गासाठी जमीन देणार नाही असा पवित्रा शेतकर्यांनी स्वीकारला आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासना समोर पुन्हा एकदा अडचण वाढली आहे. बेळगाव ते धारवाड रेल्वे लाईनचे स्वप्न अनेक वर्षापासून पाहिले जात होते. मात्र त्यासाठी लाईनचे सर्वेक्षण करताना सुपीक जमिनीतून लाईन घालण्यात आल्यामुळे समस्या निर्माण झाली असून आता शेतकर्यांची बाजू प्रशासनाला ऐकून घ्यावी लागणार आहे.
बेळगाव ते धारवाड या टप्प्यात येणार्या आणि रेल्वे लाईनला जमिनीचे नोटिफिकेशन झालेल्या सर्व शेतकर्यांनी या मोर्चात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. देसुर, नंदिहळ्ळी, राजहंसगड, के. के. कोप, नागेनहट्टी, गर्लगुंजी, अंकलगी या गावचे शेतकरी मोर्चाने जाऊन जिल्हाधिकार्यांना निवेदन देणार आहेत.
