बेळगाव : ‘गो बॅक शेट्टर’ मोहिमेनंतर जगदीश शेट्टर यांच्या उमेदवारीला असलेला विरोध शमल्याचा कितीही दावा भाजप नेते करत असले तरी हे अर्धसत्य असल्याचे आज स्पष्ट झाले. पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष महांतेश वकुंद यांनी बेळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपचे बंडखोर उमेदवार म्हणून निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले. बेळगावात शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना महांतेश वकुंद यांनी आपला बंडखोरीचा निर्णय जाहीर केला. ते म्हणाले की, बेळगाव लोकसभा मतदारसंघातील 19 लाख मतदारांना भाजपने योग्य प्रतिनिधित्व दिलेले नाही. बेळगाव जिल्ह्यात भाजपच्या संघटनासाठी अहोरात्र काम करणाऱ्यांना प्रदेश भाजप नेत्यांनी तिकीट दिले नाही. स्वार्थी राजकारणासाठी भाजपमधून काँग्रेसमध्ये गेलेले जगदीश शेट्टर यांना तिकीट दिल्याने त्यांच्या स्वाभिमानाला धक्का पोहोचल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला.
मोदी आणि भारत मातेबद्दल मला जेवढे प्रेम आणि आदर आहे, तेवढेच प्रेम आणि आदर माझ्या मतदारसंघातील लोकांबद्दल आहे.त्यांचे कल्याण करणे हा माझा धर्म आहे. बेळगावच्या जनतेच्या न्यायासाठी आवाज उठविल्याशिवाय कोणीही लोकनेता होऊ शकत नाही. लोकांसाठी न जगलेले जीवन म्हणजे जीवन नाही. संजय पाटील, अनिल बेनके, महांतेश कवटगीमठ हे भाजप उमेदवारीसाठी इच्छुक होते. पण यापैकी एकाही इच्छुकाने शेट्टर यांच्या उमेदवारीला विरोध केला नाही, असा संताप व्यक्त केला. आपल्या निवडणूक लढविण्यासंदर्भात बेळगावातील नेत्यांची मते जाणून घेण्यात आली आहेत. स्थानिक नेत्यांना तिकीट दिले नसल्याचे दु:ख होते, त्यामुळे येत्या रविवारी 31 मार्च रोजी समविचारी कार्यकर्त्यांची बैठक बोलावण्यात आली असून, सर्व कार्यकर्त्यांनी बैठकीला येण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी महांतेश वकुंद यांचे समर्थंक व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.