बेळगाव : ओमिक्रोन बरोबरच कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला आहे. कोरोना आणि ओमिक्रोनच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नवे निर्बंध जारी केले आहेत. कर्नाटक राज्यात कोरोनाला आळा घालण्यासाठी दहा दिवसांचा नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी राज्य सरकारने जिल्हा प्रशासनाला विविध प्रकारच्या सक्त सूचना केल्या आहेत. दरम्यान बेळगावातही ओमिक्रोनचा रुग्ण आढळून आला आहे. त्याचबरोबर गेल्या चार दिवसांपासून पुन्हा एकदा बेळगाव शहर परिसरात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. अशावेळी बेळगाव शहरातील उपनगर भागात खासबाग येथे भरणाऱ्या रविवारच्या आठवडी बाजारात कोरोना नियमांना पूर्णपणे पायदळी तुडवले जात आहे.
शहापूर बॅरिस्टर नाथ पै चौकापासून सुरू होणारा रविवारचा आठवडी बाजार, खासबाग बसवेश्वर चौक, बाजार गल्ली, वडगाव रोड, या मार्गावर भरत आहे. रविवारी भरणाऱ्या या आठवडी बाजारात परगावाहून हजारो छोटेमोठे व्यापारी येत असतात. त्याचबरोबर या आठवडी बाजाराला खरेदीसाठी शहापूर, वडगाव, हिंदवाडी, टिळकवाडी, येळ्ळूर, धामणे व अन्य परिसरातील नागरिक दिवसभरात हजारोंच्या संख्येने येत असतात.
आठवडी बाजारादरम्यान खरेदीसाठी होणारी प्रचंड गर्दी कोरोनाला निमंत्रण देणारी ठरत आहे. सरकार आणि प्रशासनाच्यावतीने कोरोनाला आळा घालण्यासाठी विविध निर्बंध जारी केले जात आहेत. बेळगावच्या खासबाग येथील रविवार आठवडी बाजारात होणारी प्रचंड गर्दी आणि त्यामुळे कोरोना संसर्गाचा वाढता धोका याकडे प्रशासनाने साफ दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.