बेळगाव : कावळेवाडीतील (ता. बेळगाव) वारकरी मंडळातर्फे आयोजित ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची भक्तिभावाने सांगता झाली. यानिमित्त रोज काकड आरती, ज्ञानेश्वरी वाचन, गाथा भजन, महिला भजन, नामजप, कीर्तन निरुपण आदी कार्यक्रम झाले. अधिष्ठान मारुती पाटील यांचे होते.
पहिल्या दिवशी दिंडी, हरिपाठ, प्रवचन, कीर्तन निरूपण, जागर भजन असे कार्यक्रम झाले. पारायण सोहळ्यात लक्ष्मण चोपडे, मारुती पाटील, संदीप महाराज (आजरा), यल्लाप्पा पाटील (सावगाव) यांनी प्रवचन सादर केले. लक्ष्मण चोपडे यांनी बोलताना ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज संतांची शिकवण नम्रपणे अंगिकारुन आयुष्य सुखी करण्यासाठी अध्यात्मिक ज्ञान जाणून घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. विविध गावातील भजनी मंडळांनी जागर भजन सादर केले. काकड आरती बसवंत पाटील, लक्ष्मण निलजकर, मलापा पाटील यांच्या उपस्थितीत झाली.
पखवाज साथ पांडुरंग महाराज, यल्लाप्पा नाईक (बहादरवाडी), यल्लापा महाराज (आंबेवाडी) यांनी केली. दीपोत्सवाचे मानकरी वाय. पी. नाईक होते. अध्यक्षस्थानी मोहन मोरे होते. दीपोत्सवप्रसंगी शिवाजी जाधव, मारुती बाचीकर, एम. पी. मोरे, जोतिबा मोरे, मारुती कार्वेकर, कल्लाप्पा यळ्ळूरकर, भरमाणा मोरे, संजय ओऊळकर उपस्थित होते. महाप्रसादाने सोहळ्याची सांगता झाली.