Saturday , December 14 2024
Breaking News

आनंदीबाई जोशी सरकारी प्रसुती रुग्णालयाचा लाभ गोरगरिबांना : आमदार अभय पाटील

Spread the love

स्मार्ट सिटीतील सुसज्ज रुग्णालयाचे लोकार्पण
बेळगाव (वार्ता) : केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने जनतेच्या आरोग्याची काळजी घेत विविध योजना हाती घेण्यात आल्या आहेत. सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याचे काम सरकारी अधिकारी आणि कर्मचार्‍यांचे आहे. वडगाव येथे आनंदीबाई जोशी सरकारी प्रसूती रुग्णालयाचे आज लोकार्पण करण्यात आले आहे. या रुग्णालयातून गोरगरीब व सर्व सामान्य जनतेला चांगली आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे, असा विश्वास आमदार अभय पाटील यांनी व्यक्त केला.
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत वडगाव जेल शाळेसमोर उभारण्यात आलेल्या आनंदीबाई जोशी सरकारी प्रसूती रुग्णालयाचा लोकार्पण कार्यक्रम आज सोमवारी सकाळी पार पडला. दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या हस्ते सदर सुसज्ज रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले. दोन कोटी बारा लाख रुपये खर्च करून या रुग्णालयाचे बांधकाम करण्यात आले आहे. पाच हजार पाचशे स्क्वेअर फुट जागेत उभारण्यात आलेल्या या रुग्णालयात, दहा बेडमधील पाच बेड मॅटर्निटी तर पाच जनरल वॉर्डसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. या रुग्णालयात डॉक्टर रूम, लेबर रूम, परिचारिका रूम, चेंजिंग रूम, प्रतिक्षा गृह आदींची सुविधा आहे.
रुग्णालयात शस्त्रक्रिया आणि एक प्रयोगशाळा आहे. रुग्णालयात 11 स्वच्छतागृहे आणि तीन स्नानगृहे आहेत. या रुग्णालयाचा वडगाव, भारतनगर, खासबाग या भागातील गरीब गरजूंना आणि मध्यमवर्गीयांना मोफत आरोग्य सेवा मिळणार आहे. याच रुग्णालयाचे उद्घाटन केल्यानंतर बोलताना आमदार अभय पाटील म्हणाले.
आपल्या मतदारसंघातील जनतेला चांगल्या प्रकारची वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी निरंतर प्रयत्न सुरू आहेत. कर्नाटक राज्यात सर्वाधिक लसीकरणाचे काम बेळगाव दक्षिण मतदारसंघात झाले आहे. आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत पाच लाखापर्यंत वैद्यकीय उपचाराचा खर्च सरकारने उचलला आहे. गोरगरीब जनतेला खाजगी रुग्णालयात वैद्यकीय उपचार करून घेणे परवडणारे नाही. अशा लोकांसाठी चांगल्या प्रकारची वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.
आनंदीबाई जोशी प्रसूती रुग्णालयाच्या माध्यमातून गोरगरीब आणि सर्वसामान्य जनतेला या रुग्णालयाचा चांगला लाभ मिळणार आहे. रुग्णालयातील कर्मचार्‍यांनी मानव सेवा हीच ईश्वर सेवा याच भावनेतून आपले कर्तव्य पार पाडावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी बोलताना केले. या कार्यक्रमाला नगरसेवक मंगेश पवार यांच्यासह स्मार्ट सिटी, आरोग्य विभाग, अंगणवाडी आणि आशा कार्यकर्त्या, महापालिकेचे अधिकारी तसेच नागरिक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

चंदगडचे आ. शिवाजी पाटील यांना गोविंद टक्केकर यांच्याकडून शुभेच्छा!

Spread the love  बेळगाव : सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक गोविंद टक्केकर यांनी चंदगड मतदारसंघातील नवनिर्वाचित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *