बेळगाव : सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी गेली ७० वर्षे लोकशाही मार्गाने लढा देणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीने एकनिष्ठ कार्यकर्ते महादेव पाटील यांना उमेदवारी दिली आहे. समिती नेत्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी उचगाव येथील जागृत देवता श्री मळेकरणी देवीच्या मंदिरात पूजा करून महादेव पाटील यांनी प्रचाराचा नारळ फोडला. यानंतर त्यांनी उचगावात फेरी काढून गावकरी व विविध मान्यवरांकडून शुभेच्छा स्वीकारल्या.
यावेळी बोलताना उमेदवार महादेव पाटील म्हणाले की, आज श्री मळेकरणी देवीची पूजा करून आम्ही प्रचाराला प्रारंभ केला आहे. भाजपने येथे शेट्टर यांच्यासारखा उपरा उमेदवार लादला आहे. शेट्टर मुख्यमंत्री असताना, येथील आमदार संभाजी पाटील यांनी विधानसभेत हिंदीतून बोलण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी संभाजी पाटील यांना कसा अटकाव केला होता याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. मराठी माणसावर काँग्रेस आणि भाजप या दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी अन्याय केला आहे. त्यामुळे त्यांना धडा शिवून आपल्या स्वाभिमानाची जपणूक करण्यासाठी सर्व मराठी माणसांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून मला निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी बोलताना माजी आमदार मनोहर किणेकर म्हणाले की, गेली ७० वर्षे सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आम्ही लढा देत आहोत. पण कर्नाटक सरकार आमचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेसच्या राजवटीतच बेळगावसह सीमाभागाचा अन्यायाने कर्नाटकात समावेश करण्यात आला. नेहरूंनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यानी चर्चेने हा प्रश्न सोडवावा अशी भूमिका घेतली. २०१४मध्ये देशात मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार आले. मोदींनी देशातील अनेक प्रश्न सोडवले. मात्र बेळगावचा सीमाप्रश्न त्यांनी सोडवला नाही. त्यामुळे भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी मराठी माणसावर अन्याय केला आहे. म्हणून मराठी माणसाने या लोकसभा निवडणुकीत महादेव पाटील यांना विजयी करून स्वाभिमान जपावा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी लक्ष्मण होनगेकर, माणिक होनगेकर, आर. एम. चौगले, रमाकांत कोंडूसकर, अमर येळ्ळूरकर, शहर म. ए. समितीचे कार्याध्यक्ष रणजीत चव्हाण-पाटील, किरण धामणेकर शिवानी पाटील, आर. के. पाटील, चेतन पाटील, मनोहर संताजी, विकास कलघटगी, महिंद्र जाधव, उमेश पाटील, पियुष हावळ, सागर पाटील, जोतिबा पालेकर, उदय पाटील, विराज मुरकुंबी व गावातील प्रमुख मंडळी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.