बेळगाव : खादरवाडी येथील श्रद्धास्थान असलेल्या परड्यातील आईचा यात्रोत्सव साजरा करण्याचे देवस्थान कमिटीने ठरविले आहे. त्यानिमित्ताने गावात देवीचे वार पाळण्यात येणार आहेत.
सोमवारी रात्री अकरा वाजल्यापासून ते मंगळवार दिनांक 3 मे रोजी रात्री आठ वाजेपर्यंत खादरवाडी गावात वार पाळण्यात येणार आहेत. या काळात गावातील व्यवहार, शेती कामे त्याचप्रमाणे दुकाने बंद करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे गावाबाहेर जाण्याच्या सर्व सीमा बंद करण्यात येणार आहेत. या कालावधीत गावकऱ्यांना गावाबाहेर जाता येणार नाही त्याचप्रमाणे बाहेरून येणारे पै पाहुणे किंवा गावकऱ्यांना गावात प्रवेश दिला जाणार नाही याची नोंद सर्वांनी घ्यावी असे देवस्थान कमिटीतर्फे कळविण्यात आले आहेत.
यादरम्यान कोणाला गावाबाहेर जायचे असेल तर सोमवारी वार चालू होण्याअगोदर गावाबाहेर जावे व वार संपल्यानंतरच गावात प्रवेश करावा आणि या नियमांचे जर कोणी उल्लंघन केल्यास त्यांना देवस्थान कमिटीतर्फे 2100 रुपयाचा दंड आकारण्यात येईल असा ठराव सर्वानुमते देवस्थान कमिटीने केला आहे.
देवस्थान कमिटीने व गावकऱ्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे उल्लंघन होणार नाही याची काळजी ग्रामस्थांनी घ्यावयाची आहे, असे देवस्थान कमिटी तसेच खादरवाडी ग्रामस्थांतर्फे कळविण्यात आले आहे.