खानापूर : कारवार लोकसभा मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई यांना दिवसेंदिवस वाढता पाठिंबा मिळत असून तालुक्याच्या विविध गावात प्रचारासाठी कार्यकर्ते रस्त्यावर उतरत आहेत.
सरदेसाई यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी लोकोळी, तोपिनकट्टी आदी भागामध्ये प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मतदारांच्या घरोघरी जाऊन समितीचे कार्य आणि मराठी भाषा आणि संस्कृती टिकवण्यासाठी येणाऱ्या काळात काय करावे लागेल याची माहिती मतदारांना देण्यात आली. लोकोळी आणि तोपिनकट्टी या दोन्ही गावांमध्ये सरदेसाई यांच्या प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळाला असून विविध ठिकाणी कोपरा सभा घेऊन प्रचार करण्यावर भर दिला जात आहे.
टोपिनकट्टी येथे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सरदेसाई यांनी मराठी भाषा आणि संस्कृती टिकवण्याबरोबरच युवकांना रोजगाराची संधी मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात समिती वेगवेगळ्या प्रकारचे उद्योगधंदे आपल्या भागात यावेत यासाठी प्रयत्नशील जाणार आहे. संपूर्ण मराठी बहुल भाग असलेल्या खानापूर तालुक्याचे कानडीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र त्याबाबत राष्ट्रीय पक्षांकडून कोणत्याही प्रकारचा विरोध केला जात नाही त्यामुळे मराठी भाषा टिकवण्यासाठी आपल्यालाच रस्त्यावर उतरावे लागणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत समितीला अधिक प्रमाणात मते देऊन विजयी करावे असे आवाहन केले. समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई यांनी कारवार लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यापासून प्रत्येक गावातून समितीच्या पाठीशी लोक उभे राहत आहेत त्यामुळे यावेळी चांगले यश मिळेल असा विश्वास आहे. कोणत्याही परिस्थितीत मराठी भाषिकानी राष्ट्रीय पक्षांच्या प्रलोभनांना बळी न पडता आपला स्वाभिमान दाखवून द्यावा असे मत व्यक्त केले.
तालुका समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी, माजी तालुका पंचायत सदस्य बाळासाहेब शेलार, राजाराम देसाई, मुकुंद पाटील, नारायण गावडा, सुनील पाटील, संदेश कोडोचवाडकर, प्रसाद दळवी, भीमसेन करमळकर, चन्नाप्पा गुरव, मनोहर गुरव, महादेव गुरव, ज्योतिबा खांबले, सातेरी कांचेरी, आदित पाटील, रामलिंग चीक दिनकोप, मर्याप्पा उजगावकर, जोतिबा करमळकर, लक्ष्मण गुरव, रामचंद्र हलगेकर, इस्थापा कांचेरी, मारुती कांचेरी, कल्लाप्पा बाचोलकर, गजानन हलगेकर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.