बंगळूरात मतदारात निरुत्साह; किरकोळ घटना वगळता मतदान शांततेत
बंगळूर : देशाचे भवितव्य ठरविणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील १४ मतदारसंघ आज मतदान सरासरी ७० टक्के मतदान झाले. कांही किरकोळ घटना वगळता सर्वत्र मतदान शांततेत पार पडले.
मंड्या आणि दक्षिण कन्नड लोकसभा मतदारसंघात जास्त मतदान झाले, तर बंगळुर मध्य लोकसभा मतदारसंघात कमी मतदान झाले. राजधानी बंगळुरमध्ये नेहमीप्रमाणे मतदारांची निराशा दिसून आली, मतदानाचे प्रमाण अपेक्षेप्रमाणे वाढले नाही, असे दिसून आले की ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागात लोकांनी उत्साहाने मतदान केले.
अनेक ठिकाणी मतदार यादीतून नावे गायब झाल्याचे आढळून आले. मतदान यंत्रातील बिघाड, राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची, आरोप-प्रत्यारोप यांसारख्या किरकोळ घटनांव्यतिरिक्त कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही.
सकाळपासूनच मतदार रांगेत उभे राहून उत्साहात मतदान करत असल्याचे दिसून आले. दुपारी कडक उन्हामुळे महिला व ज्येष्ठ नागरिकांनी सकाळीच मतदान केंद्रावर पोहोचून मतदानाचा हक्क बजावला. अनेक ठिकाणी तरुण मतदार आणि नवोदितांमध्ये उत्साह दिसून आला.
राज्याच्या बंगळुर दक्षिण, बंगळुर उत्तर, बंगळुर मध्य, बंगळुर ग्रामीण, उडुपी-चिक्कमगळूर, हसन, दक्षिण कन्नड, चित्रदुर्ग, तुमकूर, मंड्या, म्हैसूर, चामराजनगर, चिक्कबळ्ळापूर आणि कोलार लोकसभा मतदारसंघांसाठी आज मतदान झाले. बहुसंख्य मतदारांनी उत्साहाने मतदानाला येऊन आपला हक्क बजावला. सरासरी ७० टक्के मतदान झाले.
हसन, दक्षिण कन्नड आणि चिक्कमगळूर जिल्ह्यातील प्रत्येकी एका मतदान केंद्रावर मतदान यंत्र आणि व्हीव्ही पॅडमध्ये समस्या होती. येथे मतदानाला थोडा उशीर झाला.
निवडणूक मुक्त व निष्पक्ष निवडणूक होण्यासाठी निवडणूक आयोगाने सर्व व्यवस्था केली होती. मतदार निर्भयपणे मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर आले व त्यांनी मतदान केले. राज्यात कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. सर्वत्र मतदान शांततेत पार पडले.
हसन शहरातील सांतेपेठ येथील मतदान केंद्र क्रमांक १८९ येथे मतदान यंत्रात बिघाड झाल्याने मतदान एक तास उशिराने सुरू झाले. त्याचप्रमाणे चिक्कमंगळूरच्या अरेनूर गावात मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड झाल्याने मतदानाला उशीर झाला. दक्षिण कन्नड जिल्ह्यातील बंटवाला तालुक्यातील करोपाडी मतदान केंद्रात मतदान यंत्रात बिघाड झाल्याने मतदानात व्यत्यय आला. मतदान यंत्र दुरुस्त झाल्यानंतर मतदानाला सुरुवात झाली.
राज्यातील सर्व १४ मतदारसंघात सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. बंगळुरमध्ये मतदान करण्यासाठी अनेक मतदारांनी सकाळीच मतदान केंद्रावर येऊन मतदान केले. सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान सुरू होते. अनेक ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांनी उत्साहाने मतदान केले.
भविष्याचा निर्णय
आज झालेल्या पहिल्या टप्प्यात १४ लोकसभा मतदारसंघात एकूण २४७ उमेदवार रिंगणात असून, या सर्वांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये सुरक्षित झाले आहे. माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी, म्हैसूर राजघराण्याचे सदस्य यदुवीर दत्त वडेयार, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे बंधू, विद्यमान खासदार डी. के. सुरेश, माजी मंत्री व्ही. सोमण्णा, गोविंद कारजोळ, डॉ. के. सुधाकर यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचे राजकीय भवितव्य इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनमध्ये बंद झाले. ४ जून रोजी होणाऱ्या मतमोजणीत मतदारांचा निर्णय स्पष्ट होणार आहे.
पहिल्या टप्प्यात काँग्रेसने सर्व १४ मतदारसंघात उमेदवार उभे केले असून तीन मतदारसंघात धजद आणि ११ मतदारसंघात भाजपचे उमेदवार आपले राजकीय भवितव्य आजमावत आहेत.
आजच्या मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ५० हजारांहून अधिक पोलीस तैनात करण्यात आले होते. १४ मतदारसंघात एकूण ३०,४०२ मतदान केंद्रे, महिलांसाठी गुलाबी बूथ आणि काही ठिकाणी विशेष मतदान केंद्रेही उभारण्यात आली होती.
सुमारे १९,७०० मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग करण्यात आले असून संवेदनशील आणि अतिसंवेदनशील केंद्रांवर पोलिस बंदोबस्ताची व्यवस्था करण्यात आली आहे.
मान्यवरांचे मतदान
आज झालेल्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानात मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन, शोभा करंदलांजे यांच्यासह अनेक मान्यवरांनी मतदान केले, तसेच आयटी उद्योजक नारायण मूर्ती, विरोधी पक्षनेते आर. अशोक, माजी मंत्री व्ही. सोमण्णा, मंत्री रामलिंगा रेड्डी, के. जे. जॉर्ज, जमीर अहमद खान, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी मनोज कुमार मीना यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. स्टार चंद्रू, एम. लक्ष्मण, प्रज्वल रेवण्णा, श्रेयस पटेल, बी. एन. चंद्रप्पा, कॅप्टन ब्रिजेश चौम, पद्मराज, कोटा श्रीनिवास पुजारी, जयप्रकाश हेगडे, सुनील बोस, बलराजू, डॉ. सी. एन. मंजुनाथ, प्रा, राजीव गौडा, रक्षामय्या, के. व्ही. गौतम यांनी मतदान केले.
पोलिस आयुक्त दयानंद, माजी मंत्री के. गोपालय्या, डॉ. सी. एन. अस्वत्थ नारायण माजी केंद्रीय मंत्री रहमान खान यांनी आपल्या कुटुंबीयांसह येऊन मतदान केले. निवडणुकीत देशिकेंद्र स्वामीजी, सिद्धगंगा मठाधिपती सिद्धलिंगस्वामीजी, आदिचुंचनगिरी मठाधिपती निर्मलानंदनाथ स्वामीजी, रंभापुरी श्री यांच्यासह अनेक मठाधिपतींनी मतदान केले.
निवडणुकीवर बहिष्कार
कोलार जिल्ह्यातील मालुरू तालुक्यातील तोरणहळ्ळी ग्रामस्थांनी के. सी. व्हॅलीचे पाणी गावातील तलावात वळवावे, या मागणीसाठी मतदानावर बहिष्कार टाकला, स्थानिक आमदार आणि सशीलदार यांनी ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
ठळक घटना
– चित्रदुर्ग येथे मतदान केंद्रात ड्युटीवर असलेल्या महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू
– बंगळूरात मतदानकेंद्राजवळ एक मोठे झाड पडले. सुदैवाने कोणतीच दुर्घटना घडली नाही
– मतदानासाठी आलेल्या महिलेला हृदय विकाराचा झटका, प्राथमिक उपचार करून डॉक्टरानी जीव वाचविला
– कोलारमध्ये १०७ वर्षीय व्यंकटप्पा यांनी मतदान केले.
– बंगळूर येथील निसर्ग ग्रँड येथे मतदान करणाऱ्यांना मोफत नाश्ता
– चित्रदुर्गातील सिरीगेरे गावाजवळील सिध्दापूर मतदान केंद्रावर मतदानावर बहिष्कार
मतदारसंघ निहाय झालेले सरासरी मतदान (टक्केवारीत)
बंगळूर ग्रामीण – ६७.५
दक्षिण कन्नड – ७६.५
हसन – ७७.१
मंड्या – ८०.२
तुमकूर – ७७.४
चामराजनगर – ७४.३
म्हैसूर-कोडगू – ७०.२
चित्रदुर्ग – ७३.३
उडुपी-चिक्कमंगळूर – ७७.१
चिक्कबळ्ळापूर – ७६.२
कोलार – ७६.२
बंगळूर उत्तर – ५४.२
बंगळूर मध्य – ५२.१
बंगळूर दक्षिण – ५३.६.