Friday , June 5 2026
Breaking News

आदित्यराज कॅपिटल्सवर छापा; आर्थिक व्यवहार आणि नेटवर्किंगची सखोल चौकशी करण्याची मागणी

Spread the love

 

बेळगाव : भाग्यनगर येथील आदित्यराज कॅपिटल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवर गुरुवारी महसूल, सहकार आणि पोलीस विभागाच्या संयुक्त पथकाने छापा टाकल्याने आर्थिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. कंपनीने हजारो गुंतवणूकदारांकडून ठेवी गोळा केल्याचा आरोप असून, दरमहा ५ टक्के व्याजदराचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आकर्षित करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

प्राथमिक माहितीनुसार, सुमारे ३,५०० ठेवीदार या कंपनीशी संबंधित असून कंपनीच्या आर्थिक व्यवहारांसह तिच्या नेटवर्किंग पद्धतीची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणावर निधी जमा करण्यात आल्याने या व्यवहारांची व्याप्ती किती मोठी आहे, याचा तपास यंत्रणांकडून घेतला जाणार आहे.

कंपनीच्या संचालक मंडळामध्ये बलराज रोहिदास माने आणि ललिता बलराज माने यांची प्रमुख नावे समोर आली आहेत. याशिवाय आदित्य राज सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड, आदित्य राज ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड आणि आदित्यराज असोसिएट प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांमध्येही बलराज माने आणि ललिता माने संचालक म्हणून कार्यरत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

दरम्यान, अॅम्ब्रोसिया डेअरी अँड फूड प्रोटीन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये बलराज माने यांच्यासह सुरेश दत्तात्रेय काळे आणि चंद्रशेखर सोनवणे यांचीही संचालक मंडळात नावे असल्याचे समोर आले आहे. चंद्रशेखर सोनवणे यांचा इतर दोन कंपन्यांमध्येही संचालक म्हणून सहभाग असल्याची माहिती मिळत आहे.

या सर्व कंपन्यांमधील परस्पर संबंध, आर्थिक देवाणघेवाण आणि नेटवर्किंगच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या जाळ्याची चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. संबंधित कंपन्यांचे जाळे केवळ बेळगावपुरते मर्यादित नसून कर्नाटकातील दांडेली, हल्याळ तसेच महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानपर्यंत विस्तारले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने गुंतवणूकदार प्रभावित झाले असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने आदित्य राज समूहाशी संबंधित सर्व कंपन्यांच्या आर्थिक व्यवहारांची, निधी संकलन प्रक्रियेची आणि नेटवर्किंग व्यवस्थेची कसून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी गुंतवणूकदार आणि नागरिकांकडून होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

मराठी शाळेत कन्नड शाळा सुरू करण्यास विरोध; शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देणार

Spread the love  बेळगाव : सावगाव येथील सरकारी हायर प्रायमरी मराठी मुला-मुलींच्या शाळेच्या परिसरात कन्नड …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *