Sunday , July 26 2026
Breaking News

दुरुस्तीच्या बहाण्याने लंपास केलेले १५.७३ लाखांचे सोने शहापूर पोलिसांनी केले हस्तगत

Spread the love

 

बेळगाव : दुरुस्तीसाठी विश्वासाने दिलेला सोन्याचा हार अपहार करून लंपास करणाऱ्या आरोपीला शहापूर पोलिसांनी अटक करत १५ लाख ७३ हजार ३७० रुपये किमतीचे १०३.९७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे विश्वासघाताच्या गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे.

या प्रकरणी कृष्णा मोहन मैती (वय ३६, मूळ रा. विजयवाडा, आंध्र प्रदेश, सध्या रा. शहापूर, बेळगाव) याला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका नागरिकाने दुरुस्तीसाठी विश्वासाने दिलेला सोन्याचा हार आरोपीने मालकाच्या परवानगीशिवाय स्वतःकडे ठेवून त्याचा अपहार केला होता. हार परत मिळत नसल्याने संबंधितांनी शहापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

तक्रारीची गंभीर दखल घेत शहापूर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपीचा माग काढला. चौकशीदरम्यान आरोपीकडून १०३.९७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या दागिन्यांची किंमत १५.७३ लाख रुपयांहून अधिक असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात विश्वासघाताचा गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

बेळगाव शहर पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक एस. एस. सीमानी, पीएसआय मनीकंठ पुजारी, महिला पीएसआय एस. एन. बसवा आणि शहापूर पोलीस ठाण्याच्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी बजावली.

विश्वासघाताच्या गुन्ह्याचा उलगडा करून मोठ्या मूल्याचे सोने हस्तगत करण्यात आल्याने शहापूर पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *