Friday , November 22 2024
Breaking News

महाराष्ट्रा स्वतःच्या अस्तित्वासाठी जागा हो…

Spread the love

 

करताय ना महाराष्ट्र दिन साजरा? खूप आनंदोत्सव असेल तुमच्याकडे. संस्कृतीचा जल्लोष असेलच की? आणि हो विसरलोच हुतात्मा स्मारकावर जाऊन नमन केला की नाही? आठवणीने करा बर का. जमलच थोडा वेळ तर त्या स्मारकाच्या बाजूला असणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या नकाशाखाली काही नावे कोरली आहेत ती सुद्धा वाचा.. जास्त वेळ नाही लागणार हो. या महाराष्ट्रासाठी त्या लोकांनी जीव अर्पण केला आहे आपला. निदान त्यांची नावे मुखात एकदा तरी येतील. नाही तर रोज रडणाऱ्या तुम्हा आम्हाला त्या लोकांचं बलिदान वेदना देईल अस वाटत नाही मला. कारण आपण अश्या काळात आलोय जिथे बलिदान म्हणजे एक दिवस फुले वाहण्याचा कार्यक्रम झालाय. त्या मागचा त्याग, दुःख, अन्याय याचा काही एक परिणाम आपल्यावर होत नाही. आता देखील माझा हा लेख वाचताना अनेकांच्या मनात सहज आल असेल की या गोष्टी लिहायला बऱ्या आहेत. आपल्या आयुष्यातल्या गोष्टी आपल्याला माहिती वगैरे वगैरे. पण लेखकाची लेखणी तेव्हाच उमटते जेव्हा त्याच्या काळजाला वेदना झालेल्या असतात. हा काय मोठा लेखक म्हणणाऱ्या लोकांना देखील माझी काय हरकत नाही हो. मराठी माणसाचा स्वभावच आहे तो आपल्याला दुसऱ्याच कौतुक करता येत नाही किंवा त्यांच्या वेदनांची जाणिव देखील होत आहे. आपण मुळात महा संशयी लोक आहोत यात मला तीळ मात्र संशय नाही. विश्वास गेला पानिपतच्या युध्दात म्हणत आपण फुशारकी मारतो, खेकडे म्हणून आपणच आपणाला हिनवतो. लेखनाचे नियम तोडून सहज संवाद स्वरूपात लिहीतोय त्यामुळे आधीच दिलगिरी व्यक्त करतो. असो मूळ मुद्दा हुतात्मा चौकात कोरलेल्या त्या १०६ लोकांच्या नावाचा उल्लेख. पाहायला गेले तर शेकडो लोक आहेत ज्यांचे बलिदान, त्याग हा महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी अर्पण झाले आहे. पण यांनी क्षणाचा विलंब न करता तो जीव महाराष्ट्र धर्मासाठी सोडून दिला. छातीवर गोळ्या झेलल्या. रक्तरंजित माती करून महाराष्ट्र राज्याची गुढी उभा केली. डॉ. रणदिवे यांनी लिहिलेला तो उतारा पाहिल्यास कळेल की कशी रक्ताच्या थारोळ्यात लोक पडले होते आणि स्वतंत्र भारताचा पोलीस याच देशातील नागरिकांवर अंदाधुंद गोळीबार करत होता का तर ते लोक लढत होते मराठी भाषेच्या अस्तित्वासाठी. लोक म्हणतात आज भाषेसाठी राज्य का हवं? असं म्हणताना या लोकांच्या रक्ताचा अवमान करतोय याची थोडी जाणीव ठेवा म्हणजे पुन्हा तो प्रश्न कधी पडणार नाही की भाषेसाठी राज्य का हवं? ती १०६ नावे वाचताना १०१. मारुती बेन्नाळकर, १०२. मधुकर बांदेकर, १०३. लक्ष्मण गावडे, १०४. महादेव बारागडी, १०५. कमलाबाई मोहिते. या क्रमांकाची नावे आवर्जून वाचा. हे ते लोक आहेत ज्यांनी महाराष्ट्रासाठी बलिदान दिले पण ते ज्या भागातील आहेत तो भाग मात्र महाराष्ट्रात येवू शकला नाही. आधी लिहिल्याप्रमाणे आपल्याला याचा देखील फारसा फरक पडणार नाही. पण गेली ६७ वर्ष या भागातील लोकांनी आपले आंदोलन मात्र अविरत सुरू ठेवले आहे. या लढ्याचा फायदा अनेकांनी करून घेतला. नेते मोठे झाले पण जिथे प्रश्न सुटू शकतो तिथे गेल्यावर मात्र अनेकांना फक्त पक्ष, पद महत्वाचे वाटले. ते चिंतामणराव देशमुख एकटेच होते ज्यांनी मराठी राज्यासाठी पदत्याग केला. कारण आजच्या काळात त्यांच्या एवढी भाषिक कट्टरता आणि राज्याप्रती प्रेम कदाचित कुणाकडे पाहायला मिळेल. अपेक्षा करणे चुकीचे म्हणा. सत्तेसाठी चाललेला महाराष्ट्रातील बाजार लोकांच्या भावना समजून घेण्याच्या पलिकडचा असंवेदनशील आहे. पण तरी प्रश्न तिथेच उरतो.मराठी राज्यासाठी झगडणाऱ्या लोकांच्या व्यथा सांगून तरी काय उपयोग जेव्हा आपल्यातला मराठी मरून गेला आहे. फक्त आज या सगळ्याची एकदा आठवण करून द्यावी म्हटलं. जमलं तर आठवा त्या हुतात्म्यांना आणि जाणीव ठेवा की आजही लोक त्याच गोष्टीसाठी लढत आहेत.

बिनी मारायची अजून राहिली माझ्या जीवाची होतीय कायली
माझी मैना गावाकड राहिली माझ्या जीवाची होतीय कायाली.

राहता राहिला विषय आम्हा सीमाभागातील लोकांचा. दिशाहीन पळत सुटलाय आपण. इथेही तेच आहे एवढी वर्ष झाली अजून सुटला नाही म्हणून स्वतःची जबाबदारी झटकून रोज मारल्या जाणाऱ्या मराठीला बघत बसणारे अनेक झालेत. ज्या संघटनेच्या नेतृत्वात लढा आहे त्यावर राजकीय चिखलफेक करत स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी इतर पक्षात प्रवेश करत खूप मोठा पराक्रम केल्याचा त्यांचा भाव असतो. पण या मराठी मातीला असे कृतघ्न बघण्याची आता सवय झाली आहे. अगदी संतांपासून ते छत्रपतींपर्यंत या मातीसाठी आणि भाषेसाठी उभा असणाऱ्या लोकांना विरोध करणारे आपलेच होते. आणि असे म्हणून मी जे लढ्याच्या बाजूने आहेत ते सगळेच धुतले आहेत असेही माझे म्हणणे नाही. कारण इथे कीड लागली म्हणून दुसऱ्यांचे मनोरे उभे राहिले. इथला पाया भक्कम राहिला असता तर या संघटनेचा गड अभेद्य राहिला असता किंबहुना लढा भक्कम राहिला असता. पण अजूनही वेळ गेली नाही यश मिळविण्यासाठी सुरुवात पुन्हा कुठूनतरी करावी लागणार. आपापसातील मतभेद विसरा. पद, प्रतिष्ठा, पैसा यांच्या आहारी न जाता पुन्हा नव्या जोमाने लढा उभा करूया आणि येणाऱ्या काळात विजय मिळवूया… जय महाराष्ट्र!!

पियूष नंदकुमार हावळ, बेळगाव.

About Belgaum Varta

Check Also

भातासाठी ३ हजार रुपये आधारभूत किंमत द्या : राज्य शेतकरी संघ व हरित सेना

Spread the loveबेळगाव : राज्य शेतकरी संघ व हरित सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी भाताच्या पिकासाठी ३ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *