Sunday , September 8 2024
Breaking News

कारवार जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी आवळली वज्रमूठ

Spread the love

 

कारवार : काँग्रेसमधील नेत्यांत कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत. त्याउलट भाजपच्या नेत्यांची चलबिचलता जनतेसमोर आहे. उत्तर कन्नड मतदार संघातील सर्व काँग्रेस नेते यावेळी डॉ. अंजली निंबाळकर यांना विजयी करण्यासाठी वज्रमूठ आवळली आहे. भाजपचे आमदार, खासदारदेखील भाजपच्या सोबत नाही, ही भाजपच्या पराभवाची नांदी आहे, असे मत माजी खासदार मार्गारेट अल्वा यांनी कारवार येथील नेत्यांच्या बैठकीनंतर व्यक्त केले.

तब्बल वीस वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर या मतदार संघातील माजी खासदार मार्गारेट अल्वा यांनी कारवारमध्ये पक्षाच्या बैठकीत आणि कांही क्षण प्रचारातदेखील सहभाग घेतला. त्यामुळे कार्यकर्त्यांत आणि जनतेतही उत्साह निर्माण झाला आहे. अल्वा यांनी यावेळी भाजपला धूळ चारून डॉ. अंजली निंबाळकर यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.

यावेळी बोलतांना राज्य प्रशासकीय आयोगाचे अध्यक्ष आर. व्ही. देशपांडे यांनीही उत्तर कन्नडमधील नेत्यांमध्ये कोणत्याही प्रकारची दुही नाही. भाजपचे नेते मात्र पंतप्रधानांच्या सभेला हजेरी लावायलादेखील तयार नाहीत. मतदारांनी तर त्यांची पाठ सोडली असून भाजपच्या नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचा दावा केला.
माजी खासदार आणि ज्यांनी राज्यपाल तसेच विविध राज्यांच्या पक्ष प्रभारी म्हणून जबाबदारी पार पाडलीच, शिवाय राजकारणापेक्षा विकासाला महत्व दिले त्या मार्गारेट अल्वा पुन्हा एकदा सक्रीय झाल्याचे पाहून आनंद झाला. उत्तर कन्नड मतदार संघावर आजही त्यांचा करिष्मा कायम आहे. त्यांचा आशिर्वाद मिळाल्याने विजय अगदी दोन हातवर असल्याचे जाणवले. जनतेतही नवा उत्साह दिसला. विरोधकांना मात्र आता पळताभूई थोडी होणार आहे, असे मत डॉ. अंजली निंबाळकर यांनी बोलतांना व्यक्त केले.

बैठकीला मंत्री के. जे. जॉर्ज, जिल्हा पालक मंत्री मंकाळू वैद्य, माजी मंत्री रामनाथ रै, पक्ष प्रवक्ते निकेथ राज, आमदार सतिश सैल, युवा नेते निवेदीत अल्वा आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

गर्लगुंजी विभागीय क्रीडा स्पर्धेत गणेबैल हायस्कूलचे घवघवीत यश

Spread the love    खानापूर : गर्लगुंजी तालुका खानापूर विभागीय माध्यमिक शाळा क्रीडा स्पर्धा नुकत्याच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *