बेळगाव : हुबळी येथील नेहा हिरेमठ आणि अंजली अंबिगेर यांच्या हत्याकांडाचे पडसाद अद्याप ताजे असतानाच बेळगावातील किणये गावात अशाच प्रकारचे प्रेमप्रकरण घडल्याचे समोर आले आहे.
किणये गावातील तरुणाने आपल्या आवडत्या तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिल्याने आता पोलीस विभागासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
किणये गावातील तिप्पण्णा डुकरे (२७) याने त्याच गावातील तरुणी व तिच्या आईला जीवे मारण्याची धमकी दिली.
गेल्या तीन वर्षांपासून तिप्पण्णा त्या तरुणीचा लग्न करण्यासाठी मानसिक छळ करत होता. कॉलेजला जाताना तो तिचा पाठलाग करून त्रास देत होता. तरुण आणि तरुणी एकाच समाजातील आहेत. मात्र, तिप्पण्णासोबत तिचे लग्न करून देणे घरच्यांना पसंत नाही. तरुणाच्या त्रासाला कंटाळून मुलीच्या आईने अखेर बेळगाव ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तिप्पण्णाला पोलीस ठाण्यात बोलावून ताकीद दिली. पण पोलिसांना न जुमानता त्या तरुणाने तरुणीच्या घरावर दगडफेक करून घराची नासधूस केली. या सर्व प्रकाराला कंटाळून तरुणीने आणि आईने पोलिस संरक्षणाची मागणी केली आहे. आयुक्तांच्या सूचनेवरून तरुणीच्या घरी एक पोलीस हवालदार नेमण्यात आला आहे. बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला.