बेळगाव (वार्ता) : बेंगलोर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची काही समाजकंटकांनी विटंबना केली त्या घटनेचा निषेध बेळगावसह संपूर्ण सीमाभागात नोंदविण्यात आला मात्र याचे तीव्र पडसाद बेळगावमध्ये उमटले आणि पोलिसांनी बेळगावमधील मराठी निष्पाप तरुणांना विविध गंभीर गुन्ह्याखाली तुरुंगात डांबले. त्यामध्ये ज्येष्ठ सीमासत्याग्रही रामा शिंदोळकर यांच्या दोन्ही मुलांचा समावेश आहे.
रामा शिंदोळकरांची दोन्ही कर्ती मुले तुरुंगात असल्यामुळे त्यांची विचारपूस करून त्यांना धीर देण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महिला कार्यकर्त्या सौ. शिवानी पाटील आणि श्रीमती साधना पाटील या शुक्रवारी शिंदोळकरांच्या निवासस्थानी कोनवाल गल्ली येथे गेल्या होत्या. त्यावेळी रामा शिंदोळकर पती-पत्नीची समितीवरील निष्ठा आणि प्रेम पाहून समितीच्या महिला कार्यकर्त्या भारावून गेल्या.
कार्यकर्ता कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे शिंदोळकर पतिपत्नी आहेत. वयोवृद्ध मातापित्यांची दोन्ही कर्ती मुले तुरुंगात आहेत तरीही रामा शिंदोळकर हे खंबीरपणे उभे आहेत आणि त्यांनी कोणाकडूनही कसलीही मदतीची अपेक्षा केली नाही किंवा घडलेल्या गोष्टीबद्दल कोणाला दोषही दिला नाही, असे माध्यमांशी बोलताना सौ. शिवानी पाटील म्हणाल्या.
कोणत्याही प्रकारची मदत लागली तर समितीच्या कार्यकर्त्या म्हणून आम्ही सदैव पाठीशी आहोत, असे श्रीमती साधना पाटील यांनीही शिंदोळकर यांना आश्वासन देऊन धीर दिला.
प्रचंड आत्मविश्वास आणि समितीवर निष्ठा असलेले रामा शिंदोळकर म्हणाले की, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सर्व नेते आपल्या कार्यकर्त्यांना सहीसलामत बाहेर आणतील, असा आपला ठाम विश्वास आहे. परंतु पोलिसांनी रात्री अपरात्री घरात शिरून आपल्या मुलांना पकडून नेले. पोलीस प्रशासनाकडून होणारा हा त्रास वयोमानानुसार आता आपल्याला सहन होत नाही आणि एक सभ्य माणसाच्या घरी पहाटे 3 वाजता असा प्रकार होणे चुकीचे आहे अशी खंतही शेवटी त्यांनी व्यक्त केली.
