बेळगाव : अंगणवाडीतील बालकांना देण्यात येणाऱ्या पोषण आहाराचा बेकायदा साठा केलेल्या ठिकाणी बेळगाव महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. अंगणवाडी पोषण आहाराच्या बेकायदेशीर संकलनाच्या प्राप्त माहितीनुसार शुक्रवार (दि. ३१) मे रोजी रात्री टिळक चौकाजवळील एका इमारतीत ही कारवाई करण्यात आली. यानंतर सीडीपीओने येऊन तत्काळ तपासणी केली असता तो अंगणवाडीतील बालकांचा पोषण आहार असल्याची खात्री झाली. सुमारे १८ पोत्यांमध्ये हा पोषण आहार साठवण्यात आला होता. सविता हट्टीहोळी असे संबंधित अंगणवाडी सेविकेचे नाव असून पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महिला व बालकल्याण विभागाचे उपसंचालक नागराज यांनी अधिक माहिती दिली.
बेकायदेशीररीत्या साठवलेले पोषण आहाराचे अन्न जप्त करण्यात आले असून चौकशीअंती दोषी अंगणवाडी सेविकेवर कारवाई करण्यात येईल, असे ते म्हणाले.