Sunday , September 8 2024
Breaking News

‘सीमावासीय शिक्षक मंच’चे मराठी संवर्धनाचे कार्य कौतुकास्पद

Spread the love

 

बी. बी. देसाई; पुरस्कार विजेत्या, निवृत्त शिक्षकांचा सत्कार

बेळगाव : सीमाभागात राहून महाराष्ट्रातील विविध शाळांमध्ये शिक्षण दिनाचे कार्य करणाऱ्या सीमावासीय प्राथमिक शिक्षक मंचचे मराठी भाषा संवर्धनाचे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे. सीमा भागातील मराठी भाषा आणि संस्कृती आज अडचणीत आहे. अशा परिस्थितीत शिक्षक मंचने विविध उपक्रमांद्वारे मराठी भाषा आणि संस्कृती टिकवण्यासाठी सुरू केलेली धडपड प्रशंसनिय आहे, असे गौरवोद्गार निवृत्त मुख्याध्यापक व पत्रकार बी. बी. देसाई यांनी काढले. ते ८६५ सीमावासीय प्राथमिक शिक्षक मंचच्या वतीने आयोजित केलेल्या सेवानिवृत्त व पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या कार्यक्रमात बोलत होते.
महाराष्ट्र सरकारने दावा केलेल्या कर्नाटकातील ८६५ मराठी गावातील प्राथमिक शिक्षक महाराष्ट्रातील विविध शाळात आज शिक्षण दानाचे कार्य करीत आहेत. अशा शिक्षकांनी ८६५ सीमावासीय प्राथमिक शिक्षक मंच नावाची संघटना स्थापन करून मराठी भाषा संवर्धन व शिक्षकांच्या समस्या सोडविण्याचे कार्य हाती घेतले आहे. या संघटनेच्यावतीने हिंडलगा येथील सोमनाथ लॉनच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात बी. बी. देसाई बोलत होते. देवरवाडी प्राथमिक शाळेचे निवृत्त मुख्याध्यापक लक्ष्मण लाळगे अध्यक्षस्थानी होते.
देसाई म्हणाले, आजचा एक आदर्श विद्यार्थी आणि भावी जीवनातील आदर्श नागरिक तयार करण्याचे महत्त्वाचे कार्य शिक्षक करीत असतो. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले सुप्त गुण ओळखून ते विकसित करण्याचा प्रयत्न शिक्षकांनी केला पाहिजे. त्यामुळे विद्यार्थ्यांची भावी वाटचाल सुकर होईल.
रत्नागिरी येथील पटवर्धन इंग्लिश माध्यम शाळेचे मुख्याध्यापक प्रतापसिंह चव्हाण यांनी यावेळी मराठी भाषा संवर्धन आणि अध्यापन या विषयावर आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष लक्ष्मण लाळगे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. संघटनेचे अध्यक्ष दशरथ सूर्यवंशी यांनी संघटना स्थापन करण्याचा उद्देश स्पष्ट करून शिक्षक संघटनेतर्फे हाती घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन केल्यानंतर प्रतापसिंह चौव्हान यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पूजन केले.
स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विनायक पाटील यांनी प्रास्ताविक केले तर म्हात्रू गावडे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी राजेश काटकर, रवींद्र वीर, सिद्राय एकनेकर, अनिल पाटील, दीपक मनगुतकर, रमेश नाईक, बेबी कदम, रेणुका सुतार, चंदा कदम, शकुंतला सुतार, रंजीता देसुरकर, पुनम शिंदे विशाल धामणेकर, अजय पाटील, कल्लाप्पा एकनेकर आदी विविध पुरस्कारप्राप्त व सेवानिवृत्त शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
विठ्ठल पाटील व रेखा गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. अण्णासाहेब पाटील यांनी आभार मानले.
कार्यक्रमास संघटनेचे उपाध्यक्ष भैरू अकनोजी, कार्याध्यक्ष हनुमंत पाटील, सरचिटणीस धुळाजी कौंदलकर, निलेशकुमार सायनेकर, गोपाळ चौगुले, मारुती मिलके, विठ्ठल पाटील, अनिल पाटील, कल्लाप्पा एकनेकर, परशराम गाडेकर, विद्याधर पाटील, मनीषा पेडणेकर, शकुंतला सुतार, रेणुका सुतार, संगीता जळगेकर, मीनल बर्गे, रेखा गायकवाड यांच्यासह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

ईद-ए-मिलाद २२ सप्टेंबर रोजी साजरा करणार; मुस्लिम बांधवांचा निर्णय

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव काळातच होणार असलेला ईद-ए-मिलाद हा सण पुढे ढकलण्याचा निर्णय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *