बेळगाव : पीएसआयच्या छळाला कंटाळून एका व्यक्तीने पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला होता पण उपचारादरम्यान “त्या” तरुणाचा मृत्यू झाल्याचे समजते.
याबाबत समजलेली माहिती अशी की, उत्तर कन्नड जिल्ह्यातील जोयडा तालुक्यातील रामनगर, हनुमान गल्ली येथील रहिवासी भास्कर बोंडेलकर याने एका प्रकरणासंदर्भात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे जोयडा येथील रामनगर पीएसआय बसवराज मगनूर यांच्या विरोधात तक्रार केली होती. त्यामुळे पीएसआय बसवराज हे भास्कर याला सतत त्रास देऊ लागले. पीएसआयच्या छळामुळे भास्करने रामनगरातील नोकरी सोडून जोयडा येथे नोकरीत रुजू झाले होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी पोलिसांनी भास्करचे सासरे गणपती यांना जमिनीबाबत नोटीस बजावली होती. त्यामुळे भास्करने पोलीस ठाण्यात जाऊन विचारणा केली असता पोलिसांनी भास्करला आणि सासरच्या मंडळींनाही त्रास देण्यास सुरुवात केली आहे. पोलिस आणि भास्कर यांच्यात वादावादी झाली. भास्करने मद्यधुंद अवस्थेत येऊन पोलीस ठाण्यात गैरवर्तन केल्यामुळे पोलिसांनी त्याला मारहाण केली. पोलिसांच्या वागणुकीमुळे संतप्त झालेल्या भास्करने पोलिस ठाण्यासमोरच पेट्रोल ओतून पेटवून घेतले. पोलिसांनी आग विझवली आणि भास्करची सुटका करून त्याला रुग्णालयात दाखल केले. भास्करला बेळगाव केएलई रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जीवन-मरणाची झुंज देत असलेल्या भास्करचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.