बेळगाव : विद्यार्थ्यांना मोफत बस सेवा न दिल्यास अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने विधानसौधला घेराव घालण्याचा इशारा दिला आहे. बेळगाव येथील राणी चन्नम्मा सर्कल येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी यावे व दिलेले आश्वासन पूर्ण करावे व विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडवावा, अशी घोषणाबाजी करण्यात आली.
राज्य सरकारने शक्ती योजनेंतर्गत मोफत बससेवा उपलब्ध करून दिली आहे. याचा सर्वाधिक फायदा महिला घेत आहेत. मात्र विद्यार्थ्यांना बसमध्ये बसणे तर दूरच, उभे राहण्यासही जागा नाही. गेल्या वेळी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असता बसेसची संख्या वाढवण्याचे आश्वासन दिले. मात्र आजतागायत बसेसच्या संख्येत वाढ झालेली नाही. त्यामुळे दूरवरून येणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होत असून शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांना बसमध्ये जागा द्या, अन्यथा विद्यार्थ्यांसाठी विशेष बस द्या.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे मल्लिकार्जुन पुजारी यांनी, मुख्यमंत्री सिद्धरामय्या सरकारने हा प्रश्न गांभीर्याने घेऊन विद्यार्थ्यांना मदत न केल्यास विधानसौधला घेराव घालण्याचा इशारा दिला.
सचिन हिरेमठ यांच्यासह अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.