बेळगाव (वार्ता) : स्वामी विवेकानंद यांनी देशासाठी आणि हिंदू धर्मासाठी केलेले कार्य अतुलनीय असे होते असे विचार स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने व्यक्त करण्यात आले. येथील नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्टस संघटनेच्या बेळगाव शाखेतर्फे बुधवारी स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी संघटनेच्या कार्याबद्दल बैठक देखील घेण्यात आली. संघटनेचे कार्य बळकट करण्याच्या दृष्टीने नवीन वर्षातील या दुसर्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मागील काळातील अहवालावर चर्चा करण्यात आली. तसेच नव्याने सदस्यत्व नोंदणी करण्याबाबत सभासदांना सूचना करण्यात आली. मागील दोन वर्षे कोरोनाच्या महामारीमुळे संघटनेचे काम होऊ शकले नव्हते. मात्र पुन्हा नव्याने संघटना बळकटीसाठी कार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच सभासदांना नव्या वर्षाचे शुल्क भरण्यासाठी सूचना करण्यात आली. संघटनेच्या माध्यमातून बेळगाव जिल्ह्यात व्यापक कार्य व्हावे यासाठी पुढील काळात नवीन कार्यकारिणी सक्रिय करण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. यामध्ये बेळगाव जिल्हा, बेळगाव शहर यासह खानापूर, निपाणी, चिकोडी तालुक्यांच्या संघटना बळकट करण्याबाबत नव्या कार्यकारिणीवर चर्चा करण्यात आली. संघटनेचे बेळगाव शाखा संस्थापक अध्यक्ष श्रीकांत काकतीकर यांनी केलेल्या सूचनेनुसार पुढील पावले उचलण्याचे ठरविण्यात आले. संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदासाठी जितेंद्र पाटील, शहर अध्यक्षपदासाठी उपेंद्र बाजीकर, शहर उपाध्यक्षपदासाठी रवींद्र जाधव, खानापूर तालुका अध्यक्षपदासाठी मिलिंद देसाई यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला. तसेच शाखा प्रवक्ते पदासाठी अरुणा गोजे-पाटील यांचे नाव निश्चित करण्यात आले. तसेच त्याच्या मंजुरीसाठी तो संघटना वरिष्ठांकडे पाठविण्याचे ठरविण्यात आले. बैठकीतील चर्चेमध्ये संघटनेचे पदाधिकारी, व सदस्यांनी भाग घेतला.
