बेळगाव : अलीकडे भूमाफियांची वक्रदृष्टी गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनीवर पडताच हे भूमाफिया तसेच त्यांचे दलाल शेतकऱ्यांच्या शेतीउताऱ्यात फेरफार करून शेतजमिनी आपल्या नावे करून घेण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. त्यामुळे गोरगरीब शेतकऱ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. शेतकरी आपल्या शेतीव्यवसायत रममाण होतात रोजच्या शेती कामकाजातून वेळ काढून वारंवार आपले शेती उतारे तपासून पाहणे शेतकऱ्याला शक्य नसते याचाच फायदा काही भूमाफिया घेतात. या गैरकृत्यांना आळा घालण्यासाठी सरकार आणि संबंधित खात्याने शेतकऱ्यांचे शेती उतारे आधारला जोडणी करून त्यावर शेतकऱ्यांचे फोटो लावण्यास सुरवात केली आहे. यामुळे भूमाफियांच्या गैरप्रकारांना आळा बसेल आणि त्यामुळे शेतकऱ्यांना पीकविमा, नुकसानभरपाई तसेच इतर सुविधा मिळणे सोयीस्कर होईल. त्याचप्रमाणे विभागवार शेतकऱ्यांची गणती देखील सरकारला प्राप्त होईल. यासाठी शहापूर विभागाचे तलाठी शशिधर पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांसामावेत रयत गल्ली वडगाव येथील शेतकऱ्यांना भेटून प्रत्येक शेतकऱ्यांचा शेती उतारा आधारकार्डला जोडणी करीत आहेत. तसेच वयोवृद्ध व ज्येष्ठ शेतकऱ्यांची आधार जोडणी देखील करून देत आहेत त्यामुळे शहापूर वडगाव भागातील शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत.