बेळगाव (वार्ता) : जिल्ह्यातील कोरोना आणि ओमिक्रॉन प्रकरणांची वाढती संख्या पाहता, यावर्षीचा 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन सोहळा साधेपणाने आणि शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात आज गुरुवारी (१३ जानेवारी) प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वतयारी बैठकीच्या अध्यक्षस्थानी ते बोलत होते. यावेळी सर्वांशी चर्चा करून बोलताना हिरेमठ पुढे म्हणाले, कोविडमुळे यावेळी शालेय मुलांकडून सांस्कृतिक कार्यक्रम व परेड होणार नाही.
प्रजासत्ताक दिन हा राष्ट्रीय सण असल्याने सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे. परेडची सर्व तयारी आणि तालीम करणे आवश्यक आहे.
समारंभाच्या मंचाची तयारी, आसनव्यवस्था, ध्वनिक्षेपक, पिण्याचे पाणी आणि इतर पायाभूत सुविधांची व्यवस्था संबंधित विभागीय अधिकारी करतील. शहरातील प्रमुख चौक स्वच्छ करून रोषणाई करावी, सर्व मंदिरे, मशिदी आणि चर्चमध्ये विशेष प्रार्थना करण्याचे निर्देश दिले. सरकारी कार्यालयांवर रोषणाई करावी. तसेच जनतेनेही आपले घर व दुकान सजवावे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी, इच्छुक संघ, संस्था रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटू शकतात.
जिल्ह्य़ात सर्वत्र ध्वजसंहितेचे पालन करण्यात यावे व सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची विशेष काळजी घ्यावी तसेच ध्वजाचा अवमान होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हा आयुक्त हिरेमठ यांनी दिल्या.
सर्व विभागीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कोविड-19 मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक आहे. जनतेनेही मास्क परिधान करून सामाजिक अंतर राखून प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात सहभागी व्हावे, असे पोलिस आयुक्तांनी सांगितले. एम. बी. बोरलिंगय्या यांनी सांगितले.
बैठकीत आझादी का, अमृता महोत्सवाचा भाग म्हणून सूर्यनमस्काराचे पोस्टर जारी करण्यात आले. बैठकीला अपर जिल्हा अधीक्षक अशोक दुदगुंटी, अपर पोलीस अधीक्षक महानिंग नांदगावी, महानगर पोलीस आयुक्त रुद्रेश घाळी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, संघटनांचे अधिकारी उपस्थित होते.