बेळगाव : राहुल गांधी यांनी लोकसभेत हिंदुविरोधी वक्तव्य करून हिंदूंच्या भावना दुखावल्या. त्यामुळे त्यांनी लोकसभेत हिंदूंची माफी मागावी, असे भाजप प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी आमदार अनिल बेनके यांनी सांगितले.
बेळगाव शहरात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे हिंदू हिंसाचारी आणि दहशतवादी असल्याचे वक्तव्य निषेधार्ह आहे. हिंदू मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेऊन राहुल गांधी हिंदुविरोधी वक्तव्य करतात. त्यांच्या पक्षाला पाठिंबा देणाऱ्यांनीही दखल घ्यावी. अशा पक्षाला पाठिंबा द्यायचा की नाही याचा विचार व्हायला हवा. लोकसभेत राहुल गांधीं हिंदूंची माफी मागत नाही तोपर्यंत भाजपचा लढा सुरूच राहील, असा इशारा दिला.
हिंदुस्थान हा हिंदू संस्कृतीवर उभा आहे. अनादी काळापासून अनेकांनी हिंदू धर्म नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, या देशातून हिंदू धर्म पुसला जाऊ शकला नाही. राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या विरोधात वक्तव्य केले आहे. हे निंदनीय असून त्यांनी तातडीने माफी मागावी. नाहीतर त्यांना चांगलाच धडा शिकवायला हवा. हिंदुस्थान जगासमोर आदर्श आहे. त्यांनी जगाला शांती मंत्र आणि योगसिद्धी दिली आहे, पण हिंसाचार घडवण्यासाठी इतर देशांना दारूगोळा पाठवला नाही, असा संताप भाजपचे प्रदेश प्रवक्ते एम. बी. जिरली यांनी व्यक्त केला. यावेळी भाजप महानगर शहर अध्यक्षा गीता सुतार, नगरसेवक हणमंत कोंगाळी, विजय कोडगनूर, इरय्या खोत, महादेव बिरादार आदींचा सहभाग होता.
Belgaum Varta Belgaum Varta