Thursday , October 10 2024
Breaking News

हुतात्मा दिन गांभीर्याने पाळण्याचा तालुका समितीच्या बैठकीत निर्णय

Spread the love

बेळगाव (वार्ता) : मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांना काळे फासणार्‍या समाजकंटकांच्या सत्काराचा निषेध करण्याबरोबरच येत्या 17 जानेवारी रोजी कोरोनाचे नियमासह हुतात्मा दिन गांभीर्याने आचरणात आणून कडकडीत हरताळ पाळण्याचा ठराव बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत सर्वानुमते संमत करण्यात आला.
शहरातील खानापूर रोडवरील मराठा मंदिर येथे आज दुपारी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर हे होते. याप्रसंगी व्यासपीठावर सेक्रेटरी एम. जी. पाटील, खजिनदार एस. एल. चौगुले, माजी महापौर शिवाजी सुंठकर, माजी जि. पं. सदस्या सरस्वती पाटील आणि तालुका युवा समितीचे अध्यक्ष संतोष मंडलिक उपस्थित होते. प्रारंभी एम. जी. पाटील यांनी सर्वांचे स्वागत केल्यानंतर किणेकर यांनी प्रास्ताविकात बैठकीचा उद्देश स्पष्ट केला.
यावेळी माजी महापौर शिवाजी सुंठकर यांनी हुतात्मा दिनाबाबत आपले विचार व्यक्त करताना यापूर्वी गेली बरीच वर्ष तालुक्यात हुतात्मा दिनाचे दोन वेळा अभिवादन व्हायचे, दोन सभा होत होत्या. मात्र यावेळी तालुका समितीच्यावतीने एकाच वेळी हुतात्मा दिन अभिवादनाचा कार्यक्रम होणार हे विशेष आहे. या हुतात्मा दिनापासून तालुक्यातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या एकीचे दर्शन होण्यास सुरुवात होणार आहे असे सांगून आपण सर्वांनी या पुढे एकजुटीने राहिले पाहिजे असे स्पष्ट केले. माजी जि. पं. सदस्या सरस्वती पाटील यांनी देखील यावेळी आपले समयोचित विचार व्यक्त केले. युवा समितीचे अध्यक्ष संतोष मंडलिक यांनी आपले परखड विचार व्यक्त करून इथून पुढे आपण सर्वांनी संघटीतपणे लढा देणे हीच सिमा लढ्यातील हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे सांगितले.
अध्यक्षीय भाषणात माजी आमदार मनोहर किणेकर यांनी आपल्या भाषणात 1956 पासून सुरू असलेल्या सीमालढ्याबाबतची माहिती आणि आजपर्यंतचा समितीचा संघर्ष या बाबत थोडक्यात माहिती दिली. तसेच खरी ताकद ही निवडणुकी प्रसंगीच दिसून येते, त्यामुळे आगामी तालुका पंचायत आणि एपीएमसी निवडणुकांप्रसंगी आपण आपल्या एकीची ताकद दाखवून दिली पाहिजे. त्यावेळेसच आपली खरी ताकद कळणार आहे हे प्रत्येकाने ध्यानात घ्यावे. त्यासाठी भविष्यात आपण सर्वांनी संघटित राहणे गरजेचे आहे, असे किणेकर यांनी स्पष्ट केले. बैठकीला उपस्थित असलेल्यांपैकी अ‍ॅड. सुधीर चव्हाण आणि रामचंद्र मोदगेकर यांनी देखील आपले विचार व्यक्त केले.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांना काळे फासून शहराची शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणार्‍या समाजकंटकांचा सत्कार कांही कन्नड संघटनांनी केला आहे. कन्नड संघटनांच्या या कृतीचा बैठकीत निषेध करण्यात आला.
बैठकीतील चर्चेअंती दिवंगत समिती कार्यकर्त्यांच्या श्रद्धांजलीचा ठराव आणि कोरोनाचे नियम पाळून हुतात्मा दिन कार्यक्रम आचरणात आणण्याचा ठराव असे तीन ठराव बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आले. एम. जी. पाटील यांनी ठरावांचे वाचन केले. बैठकीस समितीच्या अन्य पदाधिकार्‍यांसह आजी-माजी लोकप्रतिनिधी आणि तालुक्यातील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

आम. असिफ सेठ यांची विविध वसतिगृहांना भेट

Spread the love  बेळगाव : बेळगाव उत्तर मतदार संघाचे आमदार असिफ (राजू) सेठ यांनी आज …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *