खानापूर (वार्ता) : 1956 मध्ये मराठी भाग कर्नाटकात डांबल्यामुळे सीमाभागात झालेल्या आंदोलनात मारुती बेन्नाळकर, मधू बांदेकर, लक्ष्मण गावडे, महादेव बारगडी, नागाप्पा होसुरकर, कमलाबाई मोहिते यांना हौतात्म्य पत्करावे लागले होते. या हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी सोमवार दि. 17 जानेवारी रोजी खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आणि कार्यकर्ते एकत्रित येऊन हुतात्मा दिन गांभीर्याने पाळला जाणार, अशी माहिती माजी आमदार दिगंबर पाटील यांनी शिवस्मरक येथे पत्रकार परिषदेत दिली.
खानापूर म. ए. समितीचे दोन्ही गट एकत्र येऊन सोमवारी हुतात्म्यांना अभिवादन करणार आहेत असे पत्रक काढण्यात आले आहे. सदर पत्रकावर दोन्ही गटाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या स्वाक्षर्या देखील आहेत.
सदर पत्रक खानापूर तालुक्यातील जनतेच्या हातात देण्यात येणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. तालुक्यात दोन्ही गट एकत्र आल्याने समिती प्रेमी मराठी जनतेतून समाधान व्यक्त होत आहे, असे माजी आमदार दिगंबर पाटील यांनी यावेळी सांगितले.
समितीचे ज्येष्ठ नेते देवाप्पा गुरव यांच्या स्वाक्षरीनिशी एकत्र हुतात्मा दिन करू असे पत्र समितीचे नेते माजी ग्राम पंचायत सदस्य पुंडलिक पाटील (करंबळ) आणि कृष्णा कुंभार (शिंगीनकोप) यांनी माजी आमदार दिगंबर पाटील यांच्या निवासस्थानी दिले. त्याला लागलीच दिगंबर पाटील यांनी संमती दर्शविली, असे यशवंत बिर्जे यांनी सांगितले आणि याबद्दल समाधान व्यक्त केले.
यावेळी आबासाहेब दळवी, मुरलीधर पाटील, प्रकाश चव्हाण, विवेक गिरी, पुंडलिक पाटील, रुक्माणा झुंजवडकर, कलराम पाटील, कृष्णा कुंभार आदी नेते उपस्थित होते.
शुक्रवारी सीमाभागात हुतात्मा दिनाचे पत्रक वाटणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
Check Also
राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी जांबोटी येथील माध्यमिक विद्यालयाच्या श्रावणी पाटील हिची निवड
Spread the love खानापूर : जांबोटी येथील माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी कु. श्रावणी भरणानी पाटील …